दोन आमदारांची राष्ट्रवादीच्या मुलखतीला दांडी ; उमेदवारीसाठी रोहित पवारांनी दिली मुलाखत




माय नगर वेब टीम
अहमदनगर - राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीला सातत्याने धक्के बसत आहे. त्याचे पडसाद गुरूवारी नगर येथील विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखतींवरही दिसले. या मुलाखतसत्राला जिल्ह्यातील पक्षाच्या दोन आमदारांनी दांडी मारली आहे. आ.राहुल जगताप उशिराने आले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जीवात जीव आला. मात्र आ.वैभव पिचड आणि आ.संग्राम जगताप यांनी पाठ फिरविली. आ.जगताप यांच्याऐवजी समर्थक आणि आ.अरूणकाका जगताप यांनी उपस्थिती लावून उमेदवारीसाठी दावा केला.दरम्यान कर्जत-जामखेड मतदार संघासाठी शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मुलाखत दिली.



आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षात उरले-सुरले नेते आणि कार्यकर्त्यांवर सत्ताधारी डाका टाकतील, या भयाने सध्या राष्ट्रवादीला ग्रासले आहे. गुरूवारी मुंबईत सचिन अहिर यांनी हातावर शिवबंधन बांधून राष्ट्रवादीला धक्का दिला. अकोले मतदारसंघाचे आ.वैभव पिचडही भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत.
पक्षाने गुरूवारी नगर येथील मुलाखती घेण्यासाठी ज्येष्ठ नेत मधुकर पिचड उपस्थित राहतील, असे म्हटले होते. मात्र ते आलेच नाहीत. ते कुठे आहेत, याचे उत्तर देता-देता पदाधिकार्‍यांची भंबेरी उडाली.
जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील, निरिक्षक अंकुश काकडे व माजी खा.देवीदास पिंगळे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार, मंजुषा गुंड, राहुरीतून प्राजक्त तनपुरे, शेवगाव-पाथर्डीतून चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे, कोपरगावातून आशुतोष काळे, पारनेरमधून सुजित झावरे, निलेश लंके, माधवराव लामखेडे आदींनी पक्षाकडे मुलाखत दिली.
नगरमधून आ.अरूणकाका जगताप यांनी आ.संग्राम यांच्यासाठी उमेदवारीवर दावा केला. नगर शहराबाबत नेत्यांनी माजी आ.दादा कळमकर यांना मत नोंदविण्यास सांगितलेेे तेव्हा ‘नंतर बोलतो’ एवढे सांगून त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले, असे समजते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post