राष्ट्रवादीच्या आमदाराच्या प्रवेशासाठी या दोन वजनदार मंत्र्याची रस्सीखेच




माय नगर वेब टीम
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार वैभवराव पिचड यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सध्या दोन मंत्र्यांची रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशासाठी राज्याचे  मंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत, तर राजकीय बेरीज करण्यासाठी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतलेले गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांना भाजपत घेण्यासाठी आसुसलेले आहेत.



आ. पिचड यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र त्यांच्या समर्थकांनी आमदार पिचड हे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ मनगटातून काढणार नाहीत. मात्र काही राजकीय कामांच्या व्यतिरिक्त वैयक्तिक कामांसाठी मुख्यमंत्र्यांशी संपर्क म्हणजे भाजप प्रवेश असा प्रचार म्हणजे राजकीय अफवा आहे. आमदार पिचड यांच्या मुलीचा सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश यादीत नाव आले आहे. तेथील प्रवेश बदलून तो मुंबई येथील महाविद्यालयात मिळावा, यासाठी त्यांनी मंत्री विखे, गिरीश महाजन व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्याचा भाजप प्रवेशाची दुरान्वयेही संबंध नाही, असा पक्षाकडून हवाला दिला गेला.

लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघातून खा. डॉ. सुजय विखे यांनी कॉंग्रेसने उमेदवारी न दिल्याने भाजपकडून निवडणूक लढविली. तसेच ही कॉंग्रेसला सोडू, अशी भूमिका आधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतली. मात्र पुन्हा ती देण्यास विरोध केला. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध विखे पाटील अशीच रंगली. त्यात विखे यांची सरशी झाली. राष्ट्रवादीची धरसोड भूमिका विखे पाटलांना जिव्हारी लागल्याने विधानसभा निवडणुकीत त्याचे पडसाद उमटणार, याची पूर्वअंदाज राजकीय जाणकारांनी तेव्हाच बांधला होता. लोकसभेनंतर अपेक्षेप्रमाणे विखे पाटलांनीही पक्षत्याग करुन भाजपचे कमळ हाती घेतले आणि विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याचा स्कोअर 12′ विरुद्ध ‘शून्य’ करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून जिल्ह्यातील राजकीय अभ्यासकांचे लक्ष विखे यांच्या राजकारणाकडे लागले होते.

त्याचा परिपाक चक्क नगरमधून निवडणूक लढविणाऱ्या आ. संग्राम जगताप यांच्यासह गेल्या 35 वर्षांपासून अकोल्याची एकहाती सत्ता राखणाऱ्या पिचडांना गळाला लावण्यात झाला. अर्थात जगताप यांच्याबाबत अद्यापही ठोस काही हाती आलेले नाही. मात्र आमदार वैभव पिचड यांनी मातोश्रीला भेट दिल्यानंतर आता वर्षा गाठल्याने त्यांचा राष्ट्रवादीला रामराम निश्‍चित झाला आहे, असे बोलले जाते आहे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post