केडगांव परिसरातील धोकादायक विजेच्या तारांची दुरुस्ती करा ; नगरसेवक मनोज कोतकर, राहुल कांबळे यांची मागणी



माय नगर वेब टीम

अहमदनगर - पावसाळा सुरु होण्यापूर्वी महावितरण कंपनीकडून विजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या काढणे, लोंबकळत असलेल्या तारांना ताण देणे, आवश्यक ती दुरुस्तीची कामे ना झाल्याने केडगाव व उपनगर परिसरात विजेच्या तारा अतिशय धोकादायक स्थितीत लोंबकळत असल्याचे दिसून येत असून अनेक ठिकाणी या तारांना झाडाझुडपांचा विळखा पडलेला आहे. ऐन पावसाळ्यात त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मनोज कोतकर व राहुल कांबळे या नगरसेवकांनी केली आहे.




केडगाव परिसर व उपनगरातील सोनेवाडी रोड, लोंढे मळा, गुंड मळा, चेंबुड मळा, शिर्के मळा, कांबळे मळा, थोरात मळा, कोतकर मळा, अमरधाम रोड, मोहिनीनगर, दुधसागर, आदर्शनगर, शास्त्रीनगर, हनुमाननगर, इंदिरानगर, विद्यानगर, रेल्वे पुल ते देवी मंदिरापर्यंतच्या रस्त्यावरील ताराबाग कॉलनी, रविश रो.हौसिंग, आव्हाड विटभट्टी आदी.परिसरामध्ये विद्युत तारांचा झोळ खाली लोंबकळत असुन काही विद्युत तारांना झाडांनी विळखा घातलेला आहे. सध्या पावसाळयाचे दिवस असल्यामुळे व वारा, वादळ येऊन विजवाहक तारा एकमेकांना चिकटल्याने दुर्घटना होवून मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनीने पावसाळा सुरु होण्यापूर्वी आवश्यक ती दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या तारा धोकादायक झाल्या आहेत.




केडगाव परिसरात ज्या विद्युत वाहक तारा लोंबकळत आहेत त्या तारांना ताण देणे आवश्यक आहे तसेच ज्या विद्युत तारांना झाडांनी विळखा घातलेला आहे अशी झाडे तोडणे अत्यंत गरजेचे आहे.तरी केडगांव परिसर व उपनगरांमधील झोळ पडलेल्या विद्युत तारांना ताण देण्यात यावा तसेच विद्युत तारांना झाडांनी विळखा घातलेली झाडे तोडण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, गिरीश पटवा, वैभव चिपाडे, जॉकी काकडे, विशाल कांबळे आदींच्या शिष्टमंडळाने महावितरणचे केडगाव उपकेंद्रातील सहाय्यक अभियंता योगेश आभाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post