राष्ट्रवादीला मोठा धक्का ! आमदार वैभव पिचड यांचा पक्षाला रामराम ?


माय नगर वेब टीम

अहमदनगर - राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे चिरंजीव अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांच्या बंडखोरीचा चर्चा चांगलीच रंगली आहे. ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू असून जर जागेची "खांदेपालट" झाली तर "भाजप" नाहीतर "शिवसेना" असा नाट्यमय प्रकार मुंबईत सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली. जवळपास राष्ट्रवादी ला रामराम करण्याचे निश्चित झाले असून कोणत्याही क्षणी धनुष्यबाण हाती घेतला जाऊ शकतो असे पिचड समर्थक सांगत आहेत.
    आमदार संग्राम जगताप सेनेच्या तर आमदार राहुल जगताप भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी जिल्ह्यातून हद्दपार होण्याची शक्यता नाकारताची येत नाही.

जिल्ह्यात एकही आमदार अन्य पक्षांचा निवडून येऊ देणार नाही असा चंग विखे पाटील पिता -पुत्राने बांधला आहे. त्यामुळे ते कामाला लागले असून नगर शहरातून "संग्राम जगताप" व अकोल्यातून "वैभव पिचड" यांना त्यांनी पहिल्या अजेंड्यावर घेतले आहे.

आता नगरच्या जागेवर उपनेते अनिलभैया राठोड हे २५ वर्षे आमदार होते. मात्र, युती न झाल्यामुळे मागिल निवडणुकीत त्यांना अवघ्या तीन हजार मतांनी पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे ही जागा अगदी थोड्या मतांनी हुकल्याने अर्थातच शिवसेना या जागेवर ठोस दावा करत आहे. तर अकोल्यात गेली ३५ वर्षे शिवसेना राष्ट्रवादीला टक्कर देत आहे. अशोक भांगरे आणि मधुकर तळपाडे हे परंपरागत योद्धे असून दोघांची ताकद एक न झाल्यामुळे आजवर पिचड  यांचे फावले आहे. त्यामुळे उद्या युती झाली तर ही जागा शिवसेना जिंकू शकते. असे असताना ठाकरे साहेब या जागा भाजपला का देतील ? हा सर्वसाधारण प्रश्न आहे.

मंगळवार दि. २३ रोजी दुपारी अकोल्याचे एक शिष्ठमंडळ पाटलांना भेटले. पाहुणचार झाल्यानंतर ते स्वत: मातोश्रीवर गेल्याचे समजते. मात्र, शिवसेनेने ही जागा भाजपसाठी सोडावी. ती निवडून आणण्याची जबाबदारी विखे पाटील घेणार असल्याचे बोलले जात आहे. आणि जर तसे नाही झाले तर "अकोल्याचे वैभव" हातातून "घड्याळ" काढून शिवधनुष्य पेलणार असल्याची माहिती हाती आली आहे. काही झाले तरी एक नक्की आहे. 



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post