विधानसभेला आ. संग्राम जगताप हातात धनुष्य घेण्याच्या तयारीत! : राठोड समर्थक अस्वस्थ
माय नगर वेब टीम
अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आ.संग्राम जगताप शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. दरम्यान भाजपाचा एक गट आमदार जगतापांच्या खांद्यावर पुन्हा एकदा भगवा देण्याची तयारी करत आहे. त्यामुळे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या समर्थकांत मोठी अस्वस्थता पसरली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे नेते यांच्यात दुरावा आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाने बोलवलेल्या बैठकांना आमदार जगताप यांची गैरहजेरी बरीच बोलकी आहे.
लोकसभा निवडणुकी पाठोपाठ जिल्ह्यातील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नगर शहरात आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप विरुद्ध शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यात लढत होईल असे प्रथमदर्शनी दिसत असले तरी पडद्यामागून नगरी राजकारणाचा वास येऊ लागला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या चौरंगी लढतीत आमदार जगताप यांनी बाजी मारली. शिवसेना उपनेते राठोड यांचा थोड्या मतांनी पराभव झाला.
आ. संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदेश डावलून महापालिका निवडणुकीत महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीत भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे पक्षाने अहमदनगर महापालिका सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली होती. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी अनेक नावांची चर्चा झाली. पक्षाध्यक्ष पवार यांनी आमदार जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. नगर मधील
' सोधा ' राजकारणाचा वापर करून विखेंना थोपवता येईल असे बोलले जात होते. या निवडणूक प्रचारादरम्यान पक्षातील नगरसेवकांचे निलंबन मागे घेतले. लोकसभा निवडणुकीत जगताप यांचा भाजपच्या डॉ. सुजय विखे यांनी पराभव केला. त्यानंतर मुंबईत पराभवाची कारणे शोधण्यासाठी चिंतन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आ. संग्राम जगताप व त्यांच्या समर्थकांनी दांडी मारली होती. यातून त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावरील नाराजी स्पष्टपणे जाणवली. लोकसभा निवडणूक प्रभावापासून ते राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यक्रमात सक्रिय दिसले नाहीत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील बैठकीत दांडी मारणारे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी नुकतीच शिवसेनेचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे समजते. तेथे त्यांची राजकीय विषयावर चर्चा झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
विधानसभेला आघाडी-युती न झाल्यास आ. जगताप भाजपात जाऊन विधानसभा लढवू शकतात असे गेल्या काही महिन्यांपासून बोलले जात आहे. तसेच विधानसभेला युती होईल असे घाटत असून नगर शहर मतदारसंघ जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे जगताप शिवसेनेच्या संपर्कात आहेत. शिंदे यांच्या भेटीच्या चर्चेने आ. संग्राम जगताप हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या चर्चेने शिवसेना उपनेते राठोड यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. यावर शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक काय भूमिका घेतात हे महत्वाचे ठरणार आहे.
Post a Comment