वारंवार मागणी करूनही नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती करण्यास टाळाटाळ
माय नगर वेब टीम
अहमदनगर- केडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक १७ मधील नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार करूनही महापालिका प्रशासनाकडून काहीच कार्यवाही होत नसल्याने सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून तात्काळ हे काम सुरु केले नाही तर नागरिकांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत नगरसेवक कोतकर यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांची सोमवारी (दि.२९) दुपारी भेट घेवून प्रशासनाची तक्रार केली. तसेच आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनाही भेटून निवेदन दिले. यामध्ये म्हंटले आहे की, प्रभाग क्रमांक १७ मधील जुने गावठाण, नविन गावठाण, कोतकर मळा, कांबळे मळा, लोंढे मळा, गुंड मळा, कापरे मळा, मोहिनीनगर, दुधसागर, आदर्श नगर, शास्त्रीनगर, हनुमाननगर, इंदिरानगर, विद्यानगर, एकता कॉलनी, ताराबाग कॉलनी, अमितनगर, आव्हाड विटभट्टी, रविश कॉलनी, सारस कॉलनी आदी. परिसरातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे.
नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती करणेबाबत आम्ही अनेक वेळा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला, प्रभाग अधिकारी, इलेक्ट्रीक विभाग प्रमुख, वायरमन यांना अनेकवेळा पथदिव्यांची दुरुस्ती करणेबाबत सांगितले परंतु अद्यापपर्यंत सदरील परिसरातील पथदिव्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. विद्युत साहित्य नसल्यामुळे परिसरामध्ये सर्वत्र अंधार पसरलेला असुन भुरट्या चो-यांचे प्रमाण तसेच छेडछाडीचे प्रमाण वाढलेले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अंधारामुळे वाहन चालकांना रस्त्यावरील खड्डे दिसत नसल्यामुळे वाहनांचे सतत अपघात घडत आहेत. सदरील परिसरातील पथदिव्यांची दुरुस्ती करुन पथदिवे सुरु करणेबाबत परिसरातील नागरीकांनी आमच्याकडे वेळोवेळी मागणी केली आहे.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे किरकोळ कामेही होईनात
प्रभागातील जनतेने आम्हांला त्यांना भेडसावणा-या नागरी समस्या सोडविण्याकरीता तसेच, प्रभागामध्ये विविध विकासकामे करण्याकरीता निवडून दिलेले आहे. परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरीकांच्या किरकोळ स्वरुपाच्या समस्या सुध्दा आम्ही सोडवु शकत नसल्यामुळे आम्हांला विनाकारण नागरीकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. नागरीकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणे हे आमचे कर्तव्य आहे. आमच्या प्रभागातील सर्व परिसरातील नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती करुन पथदिवे येत्या १५ दिवसात सुरु झाले नाही तर आपल्याला कोणत्याही प्रकारची पुर्वसुचना न देता महानगरपालिकेत नागरीकांच्या समवेत तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी नगरसेवक मनोज कोतकर यांनी दिला आहे. यावेळी नगरसेवक राहुल कांबळे, उदय कराळे, दत्ता गाडळकर, राहुल वाकळे, सतीश शिंदे आदी उपस्थित होते.
Post a Comment