माय नगर वेब टीम
अहमदनगर- मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांचा भाजपात प्रवेश निश्चित मानला जात आहे. कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर आमदार पिचड यांच्या कडून याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 30 जुलैला मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आमदार वैभव पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करणार असल्याची चर्चा समाज माध्यमात गेल्या काही दिवसापासून जोरदार सुरू होती. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखतीकडे पिचड यांच्यासह अकोले तालुक्यातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेला अधिकच बळकटी मिळाली. मात्र ते भाजपात जाणार की शिवसेनेत जाणार यावर राजकीय वर्तुळात संभ्रम अवस्था होती. आमदार पिचड हे शिवसेना किंवा भाजपात जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून अकोले तालुक्याच्या क्षेत्रात सुरू होती. समाज माध्यमात याबाबत चर्चा दावे-प्रतिदावे केले जात होते. गृहमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची यापूर्वीही त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे ते भाजपा जाणार असल्याची चर्चा सुरू होती. अकोल्याची जागा शिवसेनेकडे असल्याने पिचड यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे ते शिवसेनेत जाणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र काल प्रवेश निश्चित झाल्यामुळे हा संभ्रम संपला असल्याचे सांगण्यात येत आहे. काल पुन्हा एकदा आमदार पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान प्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित असल्याचे समजते.
Post a Comment