आ. जगतापांचा मनपाला 10 जून पर्यंतचा अल्टीमेटम ; कचरा डेपो हलवा अन्यथा मनपात धरणे




माय नगर वेब टीम

अहमदनगर-

सावेडी कचरा डेपोच्या प्रश्‍नाबाबत महापालिका प्रशासनाकडे यापुर्वी अनेकदा पत्रव्यवहार करुनही प्रशासनाने या कचराडेपोकडे दुर्लक्ष केले. या कचराडेपोला आता दुसर्‍यांदा आग लागण्याची घटना घडली आहे. सदर कचरा डेपो हलविण्याचे प्रशासनाने यापुर्वीच लेखी आश्‍वासन दिले होते. मात्र या आश्‍वासनाची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. कचरा डेपो हलविण्यासंदर्भात आता पुन्हा प्रशासनाला पत्र दिले असून त्यावर कार्यवाही न झाल्यास 10 जून रोजी नागरिकांसह महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा आ.संग्राम जगताप यांनी दिला आहे.

महानगरपालिकेच्या सावेडी कचरा डेपोला सोमवारी (दि.3) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत सर्व यंत्रसामुग्रीसह कचरा डेपो जळून खाक झाला. या आगीमुळे सावेडी पाईपलाईनरोड परिसरात धुराचे साम्राज्य पसरले असून सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे. सदरची आग मंगळवारी (दि.4) दुपारपर्यंत धुमसत होती. धुर आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.


सदर कचराडेपोची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सोमवारी (दि.3) रोजी उशिरा पाहणी केली. त्यानंतर आ.संग्राम जगताप यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

या कचराडेपोत टाकलेल्या कचर्‍यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही त्यामुळे कचर्‍याचे डोंगर तयार झाले असून या कचर्‍याला कोणी आग लावत नाही ना अशी शंका आ.जगताप यांनी उपस्थित केली.

सदरचा कचराडेपो प्रशासनाने तातडीने हलवावा अशी मागणी केली असून त्यासंदर्भात प्रशासनाला पुन्हा पत्र दिले असल्याचे आ.जगताप यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारस्कर, डॉ.सागर बोरुडे, बाळासाहेब बारस्कर, शिवाजी चव्हाण, सतिष बारस्कर, सतिष ढवण, अभिजित खोसे, स्वप्निल ढवण, सागर ढवण, प्रशांत बेल्हेकर आदी उपस्थित होते.



नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका: नगरसेवक संपत बारस्कर

सावेडी कचराडेपो संदर्भात मनपा प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे परंतु प्रशासनाने या प्रश्‍नी नेहेमीच हलगर्जीपणा दाखविला आहे. याप्रकरणात मनपाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या कचराडेपोसंदर्भात मोठी आर्थिक देवाण-घेवाण सुरु असल्याने या प्रश्‍नाकडे प्रशासनाकडून जाणुन-बूजुन दुर्लक्ष केले जात आहे. सावेडी कचरा डेपो लवकरात लवकर हलवावा अन्यथा आत्मदहन करण्यात येईल असा इशारा देतानाच नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा महापालिकेला कोणताही अधिकार नाही असे राष्ट्रवादीचे मनपातील गटनेते संपत बारस्कर यांनी म्हटले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post