माय नगर वेब टीम
मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय मराठा विद्यार्थ्यांनी त्यांचे आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलन १५ दिवसांनी मागे घेतले आहे. विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केल्यानंतर विद्यार्थ्यांद्वारे हे आंदोलन मागे घेण्यात आले. यामुळे मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण लागू होणार नसल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला. या निर्णयानंतर प्रवेश रखडले जाण्याची भिती हजारो विद्यार्थ्यांद्वारे वर्तवण्यात आली.
त्यामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले. यानंतर सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान दिले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत सरकारची याचिका फेटाळली. अखेर मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढला आणि या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली.

Post a Comment