
शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
माय नगर वेब टीम
अहमदनगर - दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी सुरु केलेल्या जनावरांच्या चारा छावणीत जनावरांना अतिशय निकृष्ट दर्जाचे पशुखाद्य दिले जात आहे.याबाबत छावणी चालकाकडे विचारणा केली असता शेतकऱ्यांना अरेरावी केली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत बावी ता.जामखेड येथील सीताराम पवार, किरण शिरोळकर, भाऊसाहेब पवार, अनिल पवार, प्रवीण निकम आदी शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.२२) जिल्हाधिकारी कार्यालयात येवून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यामध्ये म्हंटले आहे की,आम्ही सर्व शेतकरी मु.पो.बावी ता.जामखेड येथील असुन त्यांची बावी येथील चारा छावणी मध्ये आमची जनावरे आहेत. सदरचा छावणी मालक जनावरांना अत्यंत निकृष्ठ पशु खादय देतो, त्याच प्रमाणे छावणी चालु झाल्या पासुन फक्त उसाचे खाद्य देतो. त्यात आज पर्यंत बदल नाही. पशुखाद्य म्हणून गोळी पेंड देतो ती इतकी निकृष्ठ आहे की, ती जनावरे खात नाहीत. आम्ही त्यात तक्रार केल्यास तो आम्हांला दम देतो. अरेरावीची भाषा करतो. या संदर्भात आम्ही दि.२५ एप्रिल रोजी तहसिलदार जामखेड यांना तक्रारचे निवेदन दिले होते, परंतु त्यावर काही कारवाई झाली नाही. उलट तो शेतक-यांना म्हणतो तुम्ही कुठेही जा माझे काहीही होणार नाही. त्यामुळे सदरच्या छावणी मालकाला आपल्या मार्फत योग्य समज देवून जनावरांना चांगल्या दर्जाचे पशुखाद्य मिळेल याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
Post a Comment