माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात ‘नमो नेत्र संजीवनी अभियान’ राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी, भटक्या जमातींच्या वस्त्या, दलित वस्त्या, जनजाती क्षेत्रे तसेच दुर्बल घटकांच्या वस्त्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून, यामध्ये नागरिकांची नेत्ररोगासंदर्भात मोफत तपासणी, शस्त्रक्रिया व चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. हे अभियान मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक अजय काळे यांनी दिली.
हे अभियान जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच विविध विभाग, सेवाभावी संस्था, धर्मादाय रूग्णालय व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबविणाऱ्या रुग्णालयांच्या सहयोगाने आयोजित केले जाणार आहे. नेत्र शिबिरांकरिता वैद्यकीय अधिकारी, पॅरा-वैद्यकीय कर्मचारी, निदानात्मक साधने, उपचारात्मक संसाधने आणि आवश्यक औषधांची सुयोग्य उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान’ अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांची नेत्र तपासणी, उपचार व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नागरिकांच्या नेत्र आरोग्याविषयी जागरूकता वाढवून त्यांना मोफत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे अभियान जिल्हाभर राबविले जाणार आहे.
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, यांच्यासह आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नंदकुमार नेहरकर, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर संतोष रासकर, नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ संतोष चौधरी केले आहे.
या अभियानाचे उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या नेत्रविकारांचे निदान करून त्यांना मोफत उपचार उपलब्ध करून देणे होय. यामध्ये विशेषत: मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच अन्य नेत्रविकारांवरील तपासण्या व उपचार नेत्रविशेषज्ञांच्या मदतीने करण्यात येणार आहेत. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही शिबिरे आयोजित केली जातील.
जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये या अभियानात सहभागी होणार असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत. यामुळे नागरिकांना नेत्र आरोग्याविषयी अधिक जागरूकता मिळेल, गंभीर आजारांचे लवकर निदान होईल आणि योग्य वेळेत उपचार मिळतील.
या अभियानात प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील सर्व सदस्यांना तपासणीसाठी आणून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने केले आहे.

Post a Comment