रिमझिम पाऊस आणि धुक्यात रायरेश्वराची स्वच्छता ! ; खा. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतील गड किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीम



रायरेश्वर गड मोहीमेतील तिसरा गड / गडावर वृक्षारोपण /आपला मावळा सामाजिक संस्थेचीही घोषणा

अहिल्यानगर :   रिमझिम पडणारा पाऊस व संपूर्ण परिसर धुक्याने वेढलेल्या वातावरणात रायरेश्वर गडावर खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता व संवर्धन मोहिम रविवारी राबविण्यात आली. यावेळी गडावर वृक्षारोपणही करण्यात आले. 

      या मोहीमेसाठी खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील मावळे शनिवारी सायंकाळीच भोरमध्ये दाखल झाले होते. सकाळी हे मावळे किल्ल्यावर दाखल झाले. दरम्यान, खा. नीलेश लंके हे रविवारी पहाटेच गडावर दाखल झाले होते. तिथेच मुक्काम करून सकाळी ते मोहीमेत सहभागी झाले. 

      स्वराज्यातील गड-किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत स्मारके आहे. ते शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचे व पराक्रमाची साक्ष देत आहेत. आपल्या या इतिहासाचे व गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेपर्यंत पोहचवावा, त्यांच्या किल्ल्यांचा ठेवा सुस्थितीत रहावा, आपला ऐतिहासिक वारसा आपल्या भावी पिढीला समजावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे खा. लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  

वृक्षारोपण, दिवे बसवत ऐतिहासिक वारशाचे संवर्धन 

या मोहीमेमध्ये कार्यकर्त्यांनी गड परिसरात स्वच्छता करत कचऱ्याचे संकलन करीत रंगरंगोटी केली. वड, पिंपळ, शिसम, आवळा यांसारख्या वृक्षांची गडावर लागवड करण्यात आली. गडावर इलेक्ट्रिक तसेच सौर दिवे बसविण्यात आले. या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. 

आपला मावळा संघटनेची घोषणा 

आपला मावळा या संघटनेची यावेळी खा. नीलेश लंके यांनी घोषणा केली. ही संघटना गड-किल्ल्यांच्या संवर्धनासोबतच युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, इतिहासाची जाणीव आणि सामाजिक एकजुटीचे मुल्य रूजविण्यासाठी कार्य करणार असल्याचे खा. लंके यांनी यावेळी सांगितले. 

गगनभेदी घोषणांनी गड दुमदुमला 

रायरेश्वर गड हा छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची शपथ घेतलेला पवित्र गड असल्याने या मोहीमेस विशेष महत्व प्राप्त झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय  जिजाऊ जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणांनी गड परीसर दुमदुमून गेला होता. गडप्रेमी, शिवप्रेमी आणि स्थानिक नागरीकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही मोहीम अधिक प्रभावी आणि प्रेरणादायी ठरली.

मावळा संघटनेची कार्यकारणी 

यावेळी आपला मावळा संघटनेची जाहीर करण्यात आलेली कार्यकारणी पुढीलप्रमाणे : रामेश्वर निमसे : अध्यक्ष, सुधीर लाकूडझोडे कार्याध्यक्ष, दौलत गांगड उपाध्यक्ष, योगीराज गाडे उपाध्यक्ष, सीताराम काकडे सचिव, अमोल झेंडे सहसचिव, अल्ताफ शेख खजिनदार.

खा. लंके यांचे प्रयत्न मोलाचे आणि महत्वाचे  

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील किल्ले रायरेश्वर ता. भोर येथे अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नीलेश लंके यांनी स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविली. गेल्या शिवजयंतीपासून नीलेश लंके यांनी गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत ते प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी गडावर जाऊन स्वच्छता करतात. आतापर्यंत किल्ले शिवनेरी व धर्मवीरगड येथे हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. रायरेश्वरवर त्यांनी स्वच्छता करण्यासोबतच वीज व सौरदिवे, पिण्याच्या पाण्याचे रांजण, सूचना फलक व दिशादर्शक, आवष्यक तिथे रंगरंगोटी, ग्रामस्थांना रेनकोट वाटप, पेव्हींग ब्लॉक बसविणे, कचरापेटया वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले. त्यांच्या या उपक्रमात मलाही सहभागी होण्याची इच्छा होती. परंतू परदेशात दौऱ्यावर असल्याने इच्छा असूनही मला सहभागी होता आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊलखुणा जपण्यासाठी खासदार नीलेश लंके आपल्या सहकाऱ्यांसोबत करत असलेले प्रयत्न अतिशय महत्वाचे आणि मोलाचे आहेत. त्यांच्या या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा.

खासदार सुप्रिया सुळे

ऐतिहासिक क्षण अनुभवला 

रायरेश्वर गडावर आज एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. ज्या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली, त्या पवित्र भूमिवर गड संवर्धन व स्वच्छता मोहिमेची सुरूवात आपला मावळा या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हजारो मावळयांसह गड संवर्धन व स्वच्छतेबाबत शपथ घेउन नवी सुरूवात केली. 

शेकडो शिवभक्तांसह पावसाची तमा न बाळगता स्वच्छता, वृक्षारोपण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीजेचे दिवे, सूचना फलक, अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.जय भवानी, जय शिवाजी हे केवळ घोषवाक्य राहता कृतीतून शिवरायांच्या विचारांचा प्रचार होणं आवश्यक आहे. प्रत्येक गड, प्रत्येक किल्ला, हा आपल्या इतिहासाची साक्ष आहे. आपल्या पुढील पिढीला ही ठिकाणे अभिमानाने दाखवता यावीत म्हणून ही मोहिम दर महिन्याला एका गडावर राबविणार आहोत. 

खासदार नीलेश लंके 

आपला मावळा लोगोचे अनावरण 

आपला मावळा या समाजिक संघटनेसाठी उदयोन्मुख युवा डिझायनर सुदेश आबूज याने लोगोची निर्मिती केली आहे. या लोगोचे खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते रायरेश्वराच्या भूमीत अनावरण करण्यात आले होते. या लोगोसाठी प्रतिथयश डिझायनरचे प्रस्ताव प्राप्त झाले होते, मात्र नीलेश लंके प्रतिष्ठानच्या बैठकीत सुदेशच्या लोगोस पसंती देण्यात येऊन तो अंतिम करण्यात आला. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post