प्रदेश युवक काँग्रेसच्या आदेशावरून शहर युवक काँग्रेस प्रवक्ता प्रवीण गीतेची पक्षातून हकालपट्टी
माय नगर वेब टीम
अहमदनगर : राज्यभर गाजत असलेल्या नगर मधील अल्पवयीन मुलांच्या अर्धनग्न धिंड प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. परमिट रूम चालक प्रवीण शरद गीतेसह १२ आरोपींवर पोलिसांनी भा.द.वि. ३६४ अन्वये अपहरणाचे, बाल लैंगिक अत्याचार पोस्को कलम १२ सह बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ७५ वाढविले आहे. यामुळे आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी शहर युवक काँग्रेस प्रवक्ता तथा युवक काँग्रेस क्रीडा विभागाचा शहर जिल्हाधक्ष प्रवीण शरद गीते याची नेमण्यात आलेल्या पदांवरून व पक्षातून प्रदेश युवक काँग्रेसच्या आदेशावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसे प्रसिद्धी पत्रक युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांनी जारी केले आहे.
शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत काळे यांच्यावर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांचे खंडन करत राज्याचे गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे कडक कारवाईची आणि या प्रकरणाच्या खऱ्या मास्टरमाईंडचा सखोल चौकशी करत शोध घेण्याची मागणी केली होती.
त्यानंतर त्याच रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, गुन्ह्याचे तपास अधिकारी विनोद परदेशी यांनी वेगवान सूत्रे हलवत शोध मोहीम राबवत रात्री साडे अकराच्या सुमारास पप्पू पगारे (रा. नवनागापूर), सोनू शेख (रा. वडगाव गुप्ता) या दोघांना अटक करण्यात आली आहे. अद्यापही सहा आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. पगारे, शेख यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी बजावली आहे. पोलीस खऱ्या मास्टरमाईंडचा कसून तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलांच्या संदर्भामध्ये पोस्को आणि बाल न्याय अधिनियमाचे कायदे अत्यंत कडक आहेत. आरोपींनी त्या मुलांची अर्धनग्न धिंड का कडू नये ? असे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणत पोलिसांनाच थेट आव्हान दिल्याचे बोलले जात होते. त्यानंतर मात्र एमआयडीसी पोलीस ॲक्शन मोड मध्ये आले असून त्यांनी या प्रकरणांमध्ये कडक कारवाई करत आरोपींचा फास आवळला आहे.
आरोपी गीतेची हाकालपट्टी :
या प्रकरणातील आरोपी असलेले प्रवीण गीते याची शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या पदां पासून व पक्षातून निलंबित करत हकालपट्टी करण्यात आली आहे. गीते याने केलेले कृत्य अत्यंत दुर्देवी व निंदनीय बाब असून, याचे काँग्रेस पक्ष समर्थन करत नसल्याचे स्पष्ट करुन युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांनी निलंबनाचे पत्र काढले आहे. घडलेल्या निंदनीय घटनेचा काँग्रेस पक्ष अजिबात समर्थन करत नाही किंवा सदर आरोपी पक्षाचा पदाधिकारी असला तरी पक्षाची प्रतिमा कलंकित करू पाहणाऱ्या सदर पदाधिकारी गीते याला पाठीशी घातली जाणार नसल्याचे शेख यांनी स्पष्ट केले आहे.
Post a Comment