माय अहमदनगर वेब टीम
नांदेड - काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देवून भाजपात गेलेले खासदार अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये फार वेगळा अनुभव आला. अशोक चव्हाण भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले होते. पण त्यांना तिथल्या नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. नागरिकांच्या रोषामागील कारण हे मराठा आरक्षण होतं. राज्य सरकारने मराठा समाजासाठी 13 टक्क्यांच्या आरक्षणाचा कायदा मंजूर केला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा आहे. तसेच मागासर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण वैध ठरवण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जाणार आहेत. मराठा समाज हा मागास आहे हे कोर्टात सिद्ध केलं जाणार आहे. पण त्यासाठी वेळ लागणार आहे. असं असलं तरी सरकारने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे विशेष अधिवेशन बोलवून दोन्ही सभागृहातून मराठा समाजासाठी 13 टक्के आरक्षण मंजूर केलं आहे. असं असलं तरी मनोज जरांगे पाटील ओबीसी आरक्षणासाठी आग्रही आहेत. तसेच सगेसोयरेच्या भूमिकेवर ते ठाम आहेत. असं असताना आता नांदेडमध्ये भाजप खासदार अशोक चव्हाण यांना मराठा कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे गावातून काढता पाय करावे लागले.
काय घडलं?
नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारावेळी भाजप नेते अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला तोंड द्यावं लागलं. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या कोंढा गावात चव्हाणांचा दौरा होता. भाजपचे नांदेडमधील उमेदवार प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी ते गावात आल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. मात्र त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवत घोषणाबाजी केली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. पण घोषणाबाजी आणि आंदोलकांचा रोष पाहून अशोक चव्हाणांना गावातून काढता पाय घ्यावा लागला.
चव्हाण म्हणाले?
गावात घडलेल्या प्रकारामागे विरोधक असावेत, असा अशोक चव्हाणांचा सूर आहे. मात्र 6 महिन्यांपूर्वी जेव्हा अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते, तेव्हाही मराठा आंदोलक आणि चव्हाणांमध्ये बाचाबाची झाली होती. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असताना तुम्ही काय केलं? असा सवाल तेव्हा गर्दीतून झाल्यानंतर वाद वाढला होता.
“ही घटना राजकीय आहे. निवडणुकीत प्रत्येकाला जनतेत जावून आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. घडलं काहीच नाही. काय घडलं? ठीक आहे, काही लोकांनी नारेबाजी केली असेल तर करु द्या. माझं काहीच म्हणणं नाही. पण निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थच काम केलेलं आहे आणि पुढेही करत राहू. काही समज-गैरसमज पसरवण्याचं काम केलं जात आहे. जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय की आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही. त्यामुळे तो विषयच येत नाही. चळवळ बदनाम करण्याचं काम सुरु आहे. या घटनेवर पोलिसात तक्रार करण्याची गरज नाही. आधी कधी केली नाही आणि आताही करणार नाही”, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.
Post a Comment