राजकीय सलगी भोवली, झाली निलंबणाची कारवाई, नगरमधील प्रकारमाय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर -रजेवर असताना पोलिस कर्मचाऱ्याला आमदार नीलेश लंके यांनी आयोजित केलेल्या महानाट्याच्या कार्यक्रमाची माहिती देणे भोवले आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी बेलवंडी (ता. श्रीगोंदा) पोलिस ठाण्यातील कर्मचारी भाऊसाहेब शिंदे यांना निलंबित केले.

आमदार नीलेश लंके यांच्या पारनेरमधील नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे नगरमध्ये 'शिवपुत्र संभाजी' हे महानाट्य आयोजित केले होते. हे महानाट्य एक ते चार मार्चमध्ये झाले. खासदार अमोल कोल्हे हे या महानाट्यात प्रमुख भूमिकेत होते. या महानाट्याची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी झाली. याच महानाट्याची माहिती देतानाचा व्हिडिओ पोलिस कर्मचारी भाऊसाहेब शिंदे यांचा व्हायरल झाला आहे. या महानाट्याची माहिती भाऊसाहेब शिंदे देत असताना 20 फेब्रुवारीपासून ते हक्काच्या रजेवर होते. त्यावेळी भाऊसाहेब शिंदे यांनी शालेयस्तरावरील विद्यार्थ्यांना महानाट्याची माहिती सांगत होते. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल पोलिस अधीक्षक राकेश ओला  यांनी घेतली.

राकेश ओला यांनी भाऊसाहेब शिंदे यांच्या निलंबनाचा थेट आदेशच काढला. ओला यांच्या या कारवाईमुळे नगर पोलिस दलातील बेशिस्त पोलिस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ओला यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे, 'आमदार लंके यांनी आयोजित केलेल्या 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याची शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना देत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हक्क रजेवर असताना तुम्ही आमदार लंके यांनी त्यांच्या वाढदिवसनिमित्ताने आयोजित केलेल्या महानाट्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे नगर पोलिस दलास अशोभनीय आणि बेशिस्तीचे आहे, असे म्हणत भाऊसाहेब शिंदे यांच्या निलंबनाचा आदेश काढला'.

शिंदे यांच्या निलंबनाच्या आदेशाबरोबरच त्यांना नगर मुख्यालयाला नियमित हजेरी ठेवण्यात आली आहे. या काळात त्यांना कोणतीही खासगी नोकरी करता येणार नाही. तसेच पोलिस मुख्यालय सोडताना पोलिस उपअधीक्षकांची परवानगी घ्यावी लागेल, असे निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे. राकेश ओला यांनी निलंबनाचा आदेश १४ मार्चला काढला. तो बेलवंडी पोलिस ठाण्याला १८ मार्चला मिळाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post