रेल्वेसह, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, चंदीगड, राजस्थान उपांत्यपूर्व फेरीत, आज महामुकाबला




७० वी राष्टीय वरिष्ठ गट कबड्डी स्पर्धा : आज ( रविवारी ) उपांत्य व अंतिम फेरी

माय अहमदनगर वेब टीम 

 अहमदनगर -  गतविजेत्या भारतीय रेल्वेसह, उत्तर प्रदेश, चंदीगड, राजस्थान यांनी "७०व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी" स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. अहमदनगर, वाडिया पार्क क्रीडा संकुलातील मॅट वर सुरू असलेल्या उप उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशने दिल्लीचा प्रतिकार ४७-३० असा मोडून काढला. उत्तर प्रदेशने पहिले सलग ४गुण घेत आक्रमक सुरुवात केली. दिल्लीने राहुल चौधरीची पकड करीत गुणांचे खाते खोलले. १६व्या मिनिटाला लोण देत दिल्लीने १९-११ अशी आघाडी घेतली. मध्यांतराला २५-१५ अशी यु.पी. कडे आघाडी होती. मध्यांतरानंतर दिल्लीच्या विनीत मावीने ३ गडी टिपत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. पण यू.पी. ने ५ अव्वल पकड करीत दिल्लीचे मनसुबे उधळून लावले. राहुल चौधरी, विनय यांच्या झंझावाती चढाया त्याला शुभम कुमारची मिळालेली पकडीची साथ यामुळेच उत्तर प्रदेशला हे शक्य झाले. दिल्ली कडून विनीत मावी, गौरव यांचा प्रतिकार दुबळा ठरला.

चंदीगडने चुरशीच्या लढतीत गोव्याचा प्रतिकार ४४-४० असा संपुष्टात आणला. चंदीगड कडून पवन कुमार हा खेळत असून देखील चंदीगडला विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागला. त्याला या सामन्यात गुण घेणे कठीण जात होते. त्याच्या सतत पकडी होत होत्या. विश्रांतीला २३-१९ अशी चंदीगड कडे आघाडी होती. सामना सतत दोलायमान स्थितीकडे झुकत होता. सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना ४०-४० अशी बरोबरी होती. गोव्याने ५ अव्वल पकड करीत सामन्याची रंगत वाढविली. नरेंदर, राकेश यांच्या जोशपूर्ण चढाया, तर विशाल भारद्वाजचा भक्कम बचाव यामुळेच चंदीगड यशस्वी झाले. पवन कुमारला पंचानी हिरवे कार्ड दाखविले. गोव्या कडून नीरज, आशिष, सुंदर यांनी सामन्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली. भारतीय रेल्वेने पंजाबचे आव्हान ४३-२२ असे संपुष्टात आणले. पहिल्या डावात २०-०९ अशी आघाडी घेणाऱ्या रेल्वेने शेवटी २१ गुणांनी सामना खिशात टाकल.  राजस्थानने हिमाचल प्रदेश वर ४४-३७ अशी मात केली. 

महाराष्ट्राने आज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करीत विदर्भचा ४८-२४ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत त्यांची लढत कर्नाटक संघाशी होईल. कप्तान असलमने सामन्याच्या पहिल्याच चढाईत गुण घेत महाराष्ट्राचा इरादा स्पष्ट केला. ८व्या मिनिटाला लोण देत महाराष्ट्राने ११-०३ अशी आघाडी घेतली. पुन्हा दुसरा लोण देत ही आघाडी २६- ०६ अशी वाढविली. पहिल्या डावात २९-०८ अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती. उत्तरार्धात महाराष्ट्राने ३ अव्वल पकड करीत आपला बचाव देखील भक्कम आहे हे दाखवून दिले. असलम इनामदार, आकाश शिंदे, आदित्य शिंदे यांच्या तुफानी चढायांना विदर्भ कडे उत्तर नव्हते. असलमने आज पकडीत देखील चमक दाखविली. शंकर गदई, मयूर कदम यांनी महाराष्ट्राचा बचाव भक्कम राखला. विदर्भ कडून आकाश पिकलमुंडे, अभिषेक निंबाळकर, जावेद खान यांनी बऱ्या पैकी लढत दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post