लोकसभेच्या प्रचाराचा मुहूर्त ठरला; काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मोदींची पहिली सभा



माय अहमदनगर वेब टीम 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. इंडिया आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र देशात असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या बालेकिल्ल्यातच प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. शनिवारी, १६ मार्चला कलबुर्गी येथे जाहीर सभेला संबोधित करून कर्नाटकमधून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत.


पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व्ही. सुनील कुमार यांनी बुधवारी ही माहिती दिली. कलबुर्गी हा जिल्हा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एम. मल्लिकार्जुन खर्गे यांचा बालेकिल्ला मानला जातो. सन २००९ आणि २०१४ मध्ये ते येथूनच लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते; परंतु, गेल्या वेळी भाजपच्या उमेश जाधव यांच्याकडून पराभूत झाले होते.



माहितीनुसार, पक्ष यावेळी ८१ वर्षीय खर्गे यांचे जावई राधाकृष्णन दोड्डामणी यांना येथून उमेदवारी देऊ शकतो. सुनील कुमार यांनी भाजपच्या राज्य मुख्यालयात पत्रकारांना सांगितले की, पंतप्रधान मोदी १६ मार्चला कलबुर्गी येथील एनव्ही स्पोर्ट्स ग्राउंडवर जाहीर सभा घेणार आहेत, तर १८ मार्चला शिवमोग्गा येथील अल्लामप्रभू मैदानावर जाहीर सभेला संबोधित करतील.


कर्नाटक हे भाजपसाठी सर्वात महत्त्वाचे राज्य आहे, कारण दक्षिणेतील ते एकमेव राज्य आहे जिथे त्यांनी यापूर्वी स्वबळावर राज्य केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील २८ पैकी २५ जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर एक जागा पक्षाने पाठिंबा दिलेल्या अपक्षांना गेली होती.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post