माय नगर वेब टीम
अहमदनगर
मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात अंतरवाली सराटी येथे सलग १७ दिवस उपोषण करण्यात आलं. त्या उपोषणादरम्यान सरकारकडून अनेक प्रकारचे डाव टाकण्यात आले. परंतु आपण ते सारे डाव उधळून लावले. आता शेवटचा डाव सरकार टाकू शकतं. तो डाव म्हणजे तुमच्या आमच्यात फूट पाडणं. त्यामुळे भावांनो, मराठा समाजात फूट पडू देऊ नका. अन्यथा हाता तोंडाशी आलेला आरक्षणाचा घास हिरावून घेतला जाऊ शकतो. मात्र तुमच्या या एकजुटीच्या बळावर मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अहमदनगरच्या विराट सभेत बोलताना व्यक्त केला.
अहमदनगरच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या रेणुका माता मंदिरासमोरील भव्य पटांगणात ही सभा काल (दि. ७) संध्याकाळी साडेसहा वाजता होणार होती. मात्र ती सभा रात्री बारा वाजता पार पडली. उशीर झालेला असतानादेखील या सभेला मराठा समाजातले हजारो बांधव उपस्थित होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सभेसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
मनोज जरांगे पाटील यांचे सभेच्या ठिकाणी आगमन होताच त्यांच्यावर भव्य अशी पुष्पवृष्टी करण्यात आली. अधिक वेळ वाया न घालता जरांगे पाटील यांनी माईकचा ताबा घेतला आणि बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले ‘चार वर्षांत ओबीसी समाजाचे 14 टक्क्यांवरुन 30 टक्के आरक्षण गेलं. त्यांच्या १४ टक्के आरक्षणाच्या संदर्भात आमचं काहीही म्हणणं नाही. त्यांच्या १४ टक्क्यांपैकी आम्हाला एक टक्कासुद्धा नको. मात्र एका वर्षांत ओबीसीचं आरक्षण कुठल्याही समितीची शिफारस नसताना कसं वाढलं, असा आमचा प्रश्न आहे.
ओबीसी समाजाचे नेते आरक्षणासंदर्भात त्यांच्या समाजाला व्यवस्थित मार्गदर्शन करत नाहीत, ही खरं तर त्यांची चूक आहे. वास्तविक पाहता साडेतीन कोटी मराठा यापूर्वीच आरक्षणात गेला आहे. उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसींचे 14 टक्के आरक्षण सुरक्षित ठेवून वरचं जे 26 टक्के आरक्षण आहे, या आरक्षणावर मराठा समाजाचा अधिकार आहे.
पाच कोटी मराठा समाज आरक्षणात आल्यावर आपल्याला काहीच मिळणार नाही, अशी ओरड ओबीसी समाजाचे नेते करत आहेत. मात्र त्यांना याची अजिबात कल्पना नाही, की आपण 14 टक्के आरक्षण घेऊन त्यापेक्षा जास्त २६ टक्के म्हणजे एकूण 30 टक्के आरक्षण घेतलं आहे. एखाद्याच्या नावावर दोन एकर जमीन असेल आणि तो पाच एकर जमीन खात असेल तर तो नक्कीच कोणाच्या तरी मुलाला उपाशी मारत आहे, हे स्पष्ट आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रवास हा आता अंतिम टप्प्यात आहे. सरकारला आपण वेळ दिलेली नाही. सरकारने वेळ मागवून घेतली आहे. सरकारने ३० दिवस मागितले आपण ४० दिवस दिले. त्या ४० दिवसांतले 30 दिवस दि. 14 ऑक्टोबरला संपत आहेत. उरलेल्या दहा दिवसांत सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लावावा, यासाठी दि. 14 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी येथे भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
शंभर एकर जागेत होणाऱ्या या आरक्षणाच्या भव्य सभेला आपण सर्वांनीच उपस्थित राहायचं आहे. शिस्तीचे पालन करायचं आहे. सभेला माता-भगिनी मोठ्या प्रमाणात येणार आहेत. त्यांना कसलीही अडचण येणार नाही, याची काळजी मराठा समाजाच्या सर्वच स्वयंसेवकांनी घ्यायची आहे.
एखादा जर मराठा समाजाच्या विरोधात जात असेल तर तो आपलाच भाऊ आहे, हे लक्षात घ्या. त्याला काहीही न म्हणता त्याच्या घरी जाऊन त्याच्या पाया पडा. त्याला विनंती करा, की आता स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा समाजाच्या अन्नात माती कालवू नका. सर्वांनी साथ द्या. मराठा समाजाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही’.
Post a Comment