माय नगर वेब टीम
अहमदनगर : आमदार झाल्यापासून निलेश लंके यांनी पारनेर मतदारसंघात लोककार्याचा धडाका सुरू केला आहे. त्यांनी कोरोना काळातही मोठं काम केलं. अशा आमदाराला निवडून दिले याचा पारनेरच्या जनतेला नक्कीच अभिमान वाटत असेल. त्यामुळेच लंके यांच्या पाठीशी उभे राहणे आमचे कर्तव्य आहे. आमच्यावर घराणेशाहीची टीका केली जाते. त्या टीकेला लंके हे उत्तर आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदार लंके यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. पुढील वर्षभरात लंके यांच्या मतदारसंघात दीड हजार कोटींचा निधी देऊ असे सांगत लंकेंना आपले सक्रीय पाठबळ असल्याचेही पवार यांनी दाखवून दिले.
आमदार लंके यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांसाठी अजितदादा आज पारनेरला आले होते. पारनेर मतदारसंघातील ५६५ किलोमीटरलांबीची वीज वाहिनी टाकणे, १०० किलोव्हॅटची ३३६ रोहित्रे बसविणे या विकासकामांचे भूमीपूजन, काही उदघाटने झाली. सुमारे १ लाख महिलांना नवरात्रीनिमित्त श्रीमोहटादेवीचे दर्शन घडविणाऱ्या यात्रेचा शुभारंभही पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी आलेल्या पवार यांचे पारनेरवासियांनी जंगी मिरवणूक काढून स्वागत केले. त्यांच्यावर जेसीबीमधून फुलांची उधळण केली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना पवार यांनीही आमदार लंके यांच्यावर स्मृती सुमनांची उधळण केली.
पवार म्हणाले, "राष्ट्रवादीचे नेते, तत्कालीन ग्रामविकास आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांची आधुनिक गाडगेबाबा अशी ओळख होती. आता आमदार लंके यांची त्यांच्या कामातून आधुनिक श्रावणबाळ अशी ओळख झाली आहे. माझे आजोळ नगर असल्याने मला जिल्ह्याची माहिती आहे. त्यामुळे प्रश्न सोडविणे सोपे जाईल"
पवार पुढे म्हणाले, आम्ही सत्तेला हपापलेलो नाहीत. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही. उद्या आपली सत्ता असो वा नसो, लोकांना त्याच्याशी काही घेणे-देणे नसते. त्यांना त्यांची कामे होणे म्हत्वाचे वाटते. ती कामे झाली पाहिजे. तशी क्षमता लंके यांच्यात आहेत. त्यामुळे पारनेरच्या जनतेलाही योग्य लोकप्रतिनिधी निवडल्याचा अभिमान वाटत असेल.
पुढच्या वेळी येईल त्यावेळी दीड हजार कोटींची विकासकामे दाखवून देईन
"निवडणुकीला आणखी एक वर्ष बाकी आहे. पुढच्या वेळी मी जेव्हा लंके यांच्या प्रचार सभेला येईल, त्यावेळी या मतदारसंघात दीड हजार कोटी रुपयांची विकास कामे झाल्याचे दाखवून देईल. आम्ही सर्वजण मिळून ही कामे करणार आहोत. राज्यातील २८८ लोकप्रतिनिधींमध्ये जागरूक लोकप्रतिनिधी कसा असावा, तर तो नीलेश लंकेंसारखा असावा, हे लंके यांनी दाखवून दिले आहे", असेही पवार म्हणाले.
Post a Comment