मोठी बातमी : रस्त्याच्या खड्डेमुक्तीसाठी न्यायालयाचे महत्वाचे आदेश, 'तो' निधी फक्त रस्त्यांसाठीच वापरावा!



सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी दाखल केला होता खाजगी दावा
माय अहमदनगर वेब टीम 
अहमदनगर - रस्त्यांसाठी असलेला निधी फक्त रस्त्यांसाठीच वापरुन शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचा आदेश जिल्हा न्यायालयाने अहमदनगर महापालिकेचे आयुक्त व शहर अभियंता यांना दिला आहे. जिव्हाळ्याचा बनलेल्या शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्‍नावर सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी जिल्हा न्यायालयात महापालिका विरोधात खाजगी दावा दाखल केला होता.

शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय बनले असताना, सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डयांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत असताना, रस्त्यावर करण्यात आलेली पॅचिंग देखील काही दिवसात वाहून गेल्याची परिस्थिती शहरात निर्माण झाली. खड्डेमय रस्ता व चिखलामुळे निसरड्या रस्त्यांवर अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. तर इतरवेळी धुळीच्या त्रासामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याने भांबरकर यांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. तर शहरातील रस्ते निकृष्ट व खड्डेमय होण्यास जबाबदार असणाऱ्या महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी व शहरातील खड्डेमय रस्ते चांगल्या दर्जाचे मजबुत, खड्डे व धुळमुक्त करण्याची मागणी केली होती.
या प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायाधीश मनाली कुलकर्णी यांनी आदेश काढला असून, यामध्ये शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात यावे व रस्त्यासाठी असलेला निधी फक्त रस्त्याच्या कामासाठीच वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

शहरातील खड्डयांमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून, निकृष्ट काम व टक्केवारीमुळे नागरिकांना खड्डेमय रस्त्यांना तोंड द्यावे लागत आहे. महापालिका कर रुपाने जनतेकडून पैसे ग़ोळा करते. त्या मोबदल्यात नागरिकांना नागरी सुविधा देण्यास महापालिका असमर्थ ठरत आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शहर खड्डेमुक्त होण्यासाठी रस्त्याच्या कामासाठी आलेला निधी रस्त्यासाठी वापरला न गेल्यास संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करणार. -संदीप भांबरकर

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post