माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर येथील यशश्री अकॅडमी संचलित जेऊर प्री स्कूलच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. चिमुकल्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून विठ्ठल नामाचा केलेला जयघोष ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होता.
यावेळी बोलताना प्राचार्या सौ. मनीषा पवार यांनी सांगितले की, बालवयातच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना आपल्या रूढी, परंपरा जतन करण्यासाठी प्रोत्साहित केले गेले पाहिजे. त्यामुळे यशश्री प्री-स्कूल जेऊरच्या वतीने सर्व सण, उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंती मोठ्या उत्साहात साज-या केल्या जात असल्याची माहिती सौ. पवार यांनी दिली.
चिमुकल्यांनी काढलेल्या दिंडीत विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंगाच्या गजरात भजन, अभंग म्हणत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. फुगडी, रिंगण सोहळा, भगवे ध्वज, डोक्यावर तुलसी वृंदावन, पालखी मिरवणूक यामुळे दिंडीची शोभा वाढली होती. दिंडीचे प्रस्थान शाळेपासून होऊन श्री सिद्धनाथ दत्त मंदिर टोलनाक्यापर्यंत दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
चिमुकल्यांच्या दिंडीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच खाऊचे वाटप देखील करण्यात आले. दिंडीमध्ये विठ्ठल, रखुमाईची वेशभूषा केलेले चिमुकले मुख्य आकर्षण होते. दत्त मंदिर येथे भजन, आरतीने दिंडीची सांगता झाली. दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या सौ. मनीषा पवार, सौ. दिपा पवार, सौ. वेदिका मगर, सौ. राजश्री तोडमल, सौ. नलिनी खंडागळे, सौ. दिपाली बनकर यांनी परिश्रम घेतले.
_____________________
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम
यशश्री प्री- स्कूल जेऊर मध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. बालवयातच विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची निर्माण व्हावी तसेच खेळ, सण, उत्सवाचे महत्त्व पटवून दिले जाते. एकात्मतेची भावना निर्माण केली जाते.
.... सौ मनीषा पवार ( प्राचार्या, यशश्री प्री-स्कूल. जेऊर)
_______________
Post a Comment