भारत जोडो यात्रेसाठी जिल्हा काँग्रेसची जय्यत तयारी; १४ दिवस भरगच्च कार्यक्रम

 


शहरातील कार्यकर्ते शेगावच्या सभेत होणार सहभागी - किरण काळे काळेंची माहिती
माय नगर वेब टीम
अहमदनगर : सोमवारी (दि. ७) राहुल गांधींची भारत जोडो यात्रा देगलूर (जि.नांदेड) येथून तेलंगणातून महाराष्ट्रात प्रवेश करीत आहे. पुढील १४ दिवस ते महाराष्ट्रामध्ये असणार आहेत. शहरातील कार्यकर्ते शेगावला (जि. बुलडाणा) होणाऱ्या सभेत माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली यात्रेत सहभागी होणार आहेत. १४ दिवस शहरात यात्रेच्या अनुषंगाने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे.

दरम्यान, रविवारी सकाळी नगर शहरातील विविध सामाजिक, समविचारी पक्ष, संघटनांच्या वतीने भारत जोडो यात्रेच्या स्वागत व पाठिंब्यासाठी शहीद भगतसिंग पुतळा ते महात्मा गांधी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राजकारण विरहित काढण्यात आलेल्या या पदयात्रेमध्ये शहरातील युवक, जागरूक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काळे यांनी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहारातील समविचारी घटकांच्या या उत्स्फूर्त भूमिकेचे पक्षाच्या वतीने स्वागत करत असल्याचे म्हटले आहे. अशाच प्रकारचा राजकारणाच्या पलीकडे जाऊन मोठा पाठिंबा देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून यात्रेला मिळत असून ही आगामी परिवर्तनाची नांदी असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

शहरातील कार्यक्रमांविषयी माहिती देताना काळे म्हणाले की, सोमवारी यात्रा महाराष्ट्र प्रवेश करत असून याच दिवसापासून शहरात देखील कार्यक्रमांना सुरुवात होत आहे. राहुल गांधी यांना सुपूर्द करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहराच्या ऐतिहासिक मातीचा कलश माजी मंत्री थोरात यांच्याकडे दिला जाणार आहे. या कलशासाठी माती संकलन अभियानाचा शुभारंभ सोमवारी भुईकोट किल्ल्यापासून करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळकांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हे ऐतिहासिक वक्तव्य शहरातील इमारत कंपनी या ठिकाणी केले होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" ही घोषणा नगरच्या माळीवाड्यातून केली होती. या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ.आंबेडकर, महात्मा गांधी या महापुरुषांसह शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांच्या ठिकाणची माती कलशासाठी संकलित केली जाणार आहे.

त्याचबरोबर शहरातील सर्व धर्मांची धार्मिक स्थळे जसे की, मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा यासह सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या आवारातील माती देखील संकलित केली जाणार आहे. याव्यतिरिक्त नांदेडच्या १० तारखेच्या सभेचे स्क्रीनवरून शहरात प्रसारण करण्यात येणार असून यातून सभेत डिजिटली सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महिला संवाद कार्यक्रम, युवकांशी हितगुज, कामगार संवाद कार्यक्रम तसेच ज्येष्ठ नागरिकांशी देखील संवाद साधणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

📍 *१८ ला शहरातील कार्यकर्ते शेगावकडे रवाना होणार :*
१८ तारखेच्या शेगावच्या सभेत शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असून पुढील ३ दिवस राहुल गांधी महाराष्ट्रातून मध्यप्रदेशमध्ये प्रवेश करेपर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पर्यंत शहरातील कार्यकर्ते यात्रेमध्ये चालणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post