जखमी वानराचा चक्क रुग्णवाहिकेतून प्रवास ; इमामपूर घाटातील घटना वन्यप्राण्यांचे जतन व संरक्षण होणे गरजेचे- सुनिल पवार

 माय अहमदनगर वेब टीम 


 नगर तालुका-- नगर तालुक्यातील जेऊर येथील सुनिल पवार युवा प्रतिष्ठानच्या बायजामाता रुग्णवाहिकेमुळे अपघातात जखमी झालेल्या वानराचे प्राण वाचल्याची घटना इमामपूर घाटात रविवार दि. १९ रोजी घडली आहे.

     नगर-औरंगाबाद महामार्गावर इमामपूर घाटात वानराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती समजल्यानंतर जेऊर येथील सुनील पवार युवा प्रतिष्ठान संचलित रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्या रुग्णवाहिकेत जखमी वानराला जेऊर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आले. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली जखमी वानरावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्याच रुग्णवाहिकेतून जखमी वानराला पुढील उपचारासाठी वनविभागाच्या नगर येथील कार्यालयात हलविण्यात आले आहे.

       रुग्णवाहिका ही माणसांना जीवनदान देण्याचे काम करत असतात. परंतु वन्य प्राण्याला जीवनदान देण्यासाठी सुनील पवार युवा प्रतिष्ठानची रुग्णवाहिका धावून गेल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. त्यांच्यामुळे जखमी वानराला जीवनदान मिळाले आहे.

        याप्रसंगी बोलताना युवा नेते सुनील पवार यांनी सांगितले की, वन्य प्राणी हे भूतलावावरील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांचे जतन, संरक्षण होणे ही काळाची गरज आहे. सृष्टीचे चक्र सुरू राहण्यासाठी वन्यप्राण्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. वानर या प्राण्यास तर पूर्वीपासून देवाचे स्थान देण्यात आलेले आहे.

      सुनील पवार युवा प्रतिष्ठान च्या वतीने नगर-औरंगाबाद महामार्गावर होणारे अपघात तसेच जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी बायजामाता रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचा गोरगरीब तसेच अपघातातील जखमींना निश्चित फायदा होणार आहे.

        याप्रसंगी वनरक्षक श्रीराम जगताप, वनकर्मचारी संजय सरोदे, माजी सरपंच विकास कोथिंबिरे, चेअरमन मधुकर मगर, गणेश पवार, शाखाधिकारी सुनिल ससे, रुग्णवाहिका चालक हर्षल तोडमल, सुरज पवार, आकाश तोडमल, उपसरपंच श्रीतेश पवार, अनिल ससे, निलेश पवार, शरद तोडमल, सचिन मस्के, मुकेश साळवे उपस्थित होते.

__________________________________________

सुनिल पवार युवा प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद 

जेऊर गाव तसेच पंचक्रोशीत सुनिल पवार युवा प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात. कोरोना काळात वाटसरूंना अन्नदान, मोफत किराणा वाटप, दिंडी, रक्तदान शिबिर, गावातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात नेहमीच सुनिल पवार यांचा पुढाकार असतो. गावासाठी बायजामाता रुग्णवाहिका सेवा सुरू करून त्यांनी चांगला उपक्रम सुरू केला आहे.

..... विकास कोथिंबिरे (माजी सरपंच)

_______________________________________

अपघातात जखमी अवस्थेत महामार्गावर वानर पडलेले असताना त्याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करणे. वनविभागाच्या गाडीची वाट न पाहता सुनिल पवार युवा प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने वानराला उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. यावरून माणसांप्रमाणेच वन्य प्राण्यांवर असलेले प्रेम यातून दिसून येते. प्रतिष्ठानचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

..... श्रीराम जगताप (वनरक्षक, वनविभाग)

_____________________________________________

 रुग्णवाहिकेतून जखमी रुग्णांना सेवा देण्याचे काम बायजामाता रुग्णवाहिका तर अविरतपणे करणारच आहे. परंतु जेऊर परिसरात जखमी वन्यप्राणी आढळल्यास यापुढेही त्यांच्या उपचारासाठी रुग्णवाहिका सदैव हजर राहील. वन्य प्राण्यांचे जतन व संरक्षण ही काळाची गरज आहे.

...... सुनिल पवार (संस्थापक अध्यक्ष सुनील पवार युवा प्रतिष्ठान)

_______________________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post