राज ठाकरे यांनी केली भूमिका जाहीर; म्हणाले, आता नाही तर कधीच नाही... हिंदूंना केले 'हे' आवाहन...

 


माय अहमदनगर वेब टीम 

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेमध्ये मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबतची आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. यासंदर्भात सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत राज ठाकरेंनी राज्य सरकारला ३ मे चा अल्टिमेटम दिला होता. त्यात औरंगाबादमधील सभेसंदर्भात राज ठाकरेंविरोधा गुन्हा देखील दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे भोंगे उतरवण्याबाबत नेमकी काय भूमिका घेतात, याविषयी उत्सुकता ताणली गेली होती. याबाबत राज ठाकरेंनी आता जाहीर पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.





“आमचं मुस्लीम धर्मियांना एवढंच सांगणं आहे की हा सामाजिक विषय आहे हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रकत्न केला, तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानेच दिलं जाईल”, असा इशारा राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून दिला आहे.



“देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोंग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे. आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही”, असं राज ठाकरेंनी आपल्या पत्रात स्पष्ट केलं आहे.


नागरिकांसाठी तीन कलमी कार्यक्रम!

दरम्यान, राज ठाकरेंनी भोंग्यांच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सामान्य नागरिकांसाठी तीन कलमी कार्यक्रमच आपल्या पत्रात जाहीर केला आहे.


“हिंदू सणांना सायलन्स धोन, शाळा, रुग्णालय अशा सर्व नावांखाली अटी घालायच्या पण मशिगदींना कोणत्याही अटी नाहीत. संविधानाने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येत हे बसतं? म्हणूनच हिंदूंनो…



१- त्यांना आपली हनुमान चालीसा ऐकवा.

२- सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत.

३- मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या झाल्या पोलिसांसाठीच्या १०० क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांच्या त्रासाबद्दल तक्रार करावी. रोज करावी”


असं या जाहीर पत्रात राज ठाकरेंनी आवाहन केलं आहे.



“हा विषय एका दिवसात सुटणारा नाही”

दरम्यान, हा मुद्दा एका दिवसात सुटणारा नसल्याचं राज ठाकरे पत्रात म्हणाले आहेत. “हा विषय एका दिवसात सुटणारा नाही याचीही मानसिक तयारी ठेवावी. देशातील सर्व राज्यकर्त्यांना हे भोंगे बंद पाडण्यास भाग पाडावे. प्रत्येक राज्यातल्या नागरिकांनी आपल्या सत्ताधारी राज्यकर्त्यांना हिंदूंची ताकद काय आहे हे दाखवून द्यावे”, असं या पत्रात राज ठाकरे म्हणाले आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन

या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे. “महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बैगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊनच जाऊ दे”, असं आव्हानच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.


“पोलिसांनी कायद्याचं राज्य दाखवून द्यावं!”

दरम्यान, आपल्या पत्रातून राज ठाकरेंनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवणाऱ्या पोलिसांनाच आवाहन केलं आहे. “कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की या देशात, या राज्यात कायद्याचं राज्य आहे हे त्यांनी दाखवून द्यावं. त्यांनी अनधिकृत मशिदी, अनधिकृत भोंगे, रस्त्यांवर होणारे नमाज पठण यांना जबाबदार असलेल्या लोकांना आपला पोलिसी खाक्या दाखवावा”, असं राज ठाकरे पत्रात म्हणाले आहेत.


“देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबण सरकारला शक्य होईल. हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे. माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या. आता नाही तर कधीच नाही”, असं देखील पत्राच्या शेवटी राज ठाकरेंनी नमूद केलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post