माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- - नगर तालुक्यातील जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रा उत्सवाची सांगता कुस्त्यांच्या हगाम्याने करण्यात आली.
बायजामाता यात्रा उत्सव तीन दिवस भरत असतो. दोन वर्षानंतर भरण्यात आलेल्या या उत्सवाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वैशाख बुद्ध पौर्णिमेला बायजामाता यात्रोत्सवाला सुरुवात होत असते. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. सोमवार दि. १६ मे ते बुधवार दि. १८ मे या कालावधीत यात्रा उत्सव संपन्न झाला.
देवीला गंगेच्या पाण्याचा जलाभिषेक, कावड मिरवणूक, पालखी मिरवणूक, शोभेच्या दारूची आतषबाजी, वांगे भाकरीचा महाप्रसाद याचबरोबर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. बायजामाता देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. यात्रा उत्सवाच्या काळात पंचक्रोशीतून तसेच संपूर्ण राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. याकाळात बायजामातेचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले आहे. येथील वांगे भाकरीचा महाप्रसाद व दोन दिवस चालणारा कुस्त्यांचा हगामा हे येथील यात्रेचे वैशिष्ट्य आहे.
खेळणीचे दुकाने, रहाट गाडगे, विविध खेळांची यात्रेत रेलचेल होती. यात्रोत्सवा दरम्यान सुमारे ९० लाखांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कुस्त्यांच्या हगाम्यासाठी राज्यातील नामवंत मल्ल आले होते. जय भवानी उद्योग समूहाच्या वतीने गोरख काळे व संतोष काळे यांनी आपले आजोबा कै.पैलवान बापूराव काळे व वडील कै. पोपटराव काळे यांच्या स्मरणार्थ ११ हजार रुपयांची कुस्ती लावली होती.
उद्योजक सतीष थोरवे यांनी कै. माजी जि. प. सदस्य रोहिदास मगर व कै. खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन दत्तात्रय मगर यांच्या स्मरणार्थ पंधरा हजार रुपयांची कुस्ती लावली होती. यात्रोत्सवासाठी एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रा उत्सव शांततेत पार पडण्यासाठी ग्रामस्थ व यात्रा उत्सव समितीने प्रयत्न केले.
________________________________________________
Post a Comment