नुसत्या घोषणा नव्हे, शिवसेना करूनच दाखवते..!



 कल्याण रोड परिसरातील रस्त्यांसाठी शासनाकडून 20 कोटींचा निधी मंजूर : महापौर रोहिणीताई संजय शेंडगे

माय अहमदनगर वेब टीम -

 महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आल्यानंतर नगर शहर व उपनगर परिसरातील समस्याचा आढावा घेऊन त्या  कायमस्वरूपी सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. विशेषतः शहरातील व उपनगरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री मा.ना.श्री.उध्दवजी ठाकरे साहेब व नगर विकास मंत्री मा.ना.श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे निधीची मागणी केलेली आहे. विविध कामांचे प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे सादर करण्यात आले आहेत


      यापैकी पहिल्या टप्प्यात नगरविकास विभागाकडून मूलभूत सोयी सुविधा योजनेतून नगर शहरातील कल्याण रोड परिसरातील तीन रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामासाठी रक्‍कम रूपये 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून प्रभाग क्रमांक 8  व 15 मधील अनुसया नगर ते सीना नदी पर्यंत डीपी रस्त्यासाठी 8 कोटी रुपये, कल्याण रोडवरील आदर्श नगर मधील रस्त्यांसाठी 6 कोटी 50 लाख रुपये, विद्या कॉलनी अंतर्गत डीपी रस्त्याच्या कामासाठी 5 कोटी 50 लाख  रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हे सर्व रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.


      नगर शहर व उपनगर परिसरामध्ये कामांना निधी मिळावा, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. नगर शहराचे माजी आमदार स्वर्गीय अनिलभैया राठोड यांच्या प्रेरणेतून काम करताना व महापालिकेत महापौर म्हणून काम करताना सर्वांना बरोबर घेऊन शहरातील प्रश्न सोडवण्याचा प्राधान्याने प्रयत्न करत आहे. कल्याण रोड उपनगर परिसरात रस्त्यांसह विविध समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. या भागातील समस्या सोडविण्याच्या वल्गना अनेकांनी केल्या. मात्र, राज्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे या समस्यांबाबत लक्ष वेधल्यानंतर शासनाने रक्‍कम रू.20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शिवसेना केवळ घोषणा अथवा वल्गना करत नाही, तर करूनच दाखवते, हे पुन्हा एकदा शिवसेनेने दाखवून दिले. या पुढील काळातही शहरातील विविध कामांसाठी शासनाकडे निधी मिळवण्यासाठी पाठवलेले प्रस्ताव मार्गी लागतील व मोठ्या स्वरूपात निधी नगर शहराला मिळेल. मागील काही महिन्यात कोरोनामुळे निधी उपलब्ध होण्यासाठी आलेल्या अडचणी दूर करून निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती महापौर रोहिणीताई संजय शेंडगे यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post