अहमदनगर |
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30 रा. पिंपळगाव कौडा ता. नगर) असे मयताचे नाव आहे. शनिवारी रात्री सात ते रविवारी सकाळी सात वाजेच्यादरम्यान पिंपळगाव कौडा येथील गोपीचंद याच्या राहत्या घरात ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात मयत गोपीचंद याची पत्नी श्रुती कैलास चव्हाण (रा. वडारवाडी, भिंगार) हिच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
गोपीचंद याची आई कमल रोहिदास भोसले (वय 50 रा. पिंपळागाव कौडा) यांनी फिर्याद दिली आहे. गोपीचंद याचा विवाह श्रुती सोबत झाला होता. विवाह झाल्यापासून गोपीचंद व श्रुती यांच्यात वेळोवेळी भांडण होत असे. श्रुती ही गोपीचंद याच्यासोबत भांडण करून तिच्या माहेरी वडारवाडी येथे जात होती. सध्या ती माहेरी वडारवाडी येथे होती. सासरी नांंदायला येण्यासाठी श्रुतीने गोपीचंदकडे 30 हजार रूपये मागितले होते. तिच्या आई-वडिलांच्या खर्चासाठी तीने गोपीचंदकडे 30 हजार रूपयांसाठी तगादा लावला होता.
या त्रासाला कंटाळून शनिवारी रात्री गोपीचंद याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे कमल भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहे.
Post a Comment