लोणी | राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील अनिल प्रभाकर उदावंत (वय 42) याने मंगळवारी लोणी पोलीस ठाण्यात विष प्राशन करून जाताना फेसबुकवर अखेरची पोस्ट टाकत माझ्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याने मी हे करीत असून माझ्या मृत्यूला शेतकरी आत्महत्या समजू नये असा मजकूर टाकल्याने लोणी परिसरात एकच खळबळ उडाली. या पोस्टची सत्यता पोलिसांना तपासावी लागणार आहे. दरम्यान बुधवारी रात्री अनिलचा मात्र मृत्यू झाला.
सुत्रांच्या माहितीनुसार अनिल उदावंत आणि त्याच्या नातेवाईकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्यांनी लोणी पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्याने पोलिसांनी गुन्हेही दाखल केलेले आहेत. बुधवार दि. 10 रोजी रात्री अनिलचा प्रवरा रुग्णालयात मृत्यू झाला. अनिल मंगळवारी सकाळी लोणी पोलीस ठाण्यात आला होता. अधिक माहिती देताना लोणी पोलिसांनी सांगितले की, त्याच्या हातात विषाची बाटली होती. तो विष पिऊन आलेला होता. परिस्थितीचे गांभीर्य बघून पोलिसांनी त्याला प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला. परंतु त्याचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मात्र लोणीत समाज माध्यमावर अनिल उदावंत यांनी विष प्राशन करण्यापूर्वी फेसबुकवर टाकलेली एक पोस्ट फिरत आहे. मंगळवारी पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वी अनिलने ही पोस्ट टाकल्याचे बोलले जाते. त्यात त्याने माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे देणारे व दाखल करणारे माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत. माझी आत्महत्या शेतकरी आत्महत्या समजू नये अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे. त्याच्या विरुद्ध कुणी तक्रारी दिल्या व अनिलच्या मृत्यू मागील नेमके हेच कारण आहे का याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.अनिलच्या कुटुंबातील कुणी तक्रार देण्यास पुढे आल्यास या घटनेचे गांभीर्य वाढण्याची शक्यता आहे.
Post a Comment