जायकवाडीची टांगती तलवार कायम



30 ऑगस्ट 2021 रोजी दारणा समुहात 17 टीएमसी (78टक्के), गंगापूर समुहात 7.7 टीएमसी (82टक्के), भंडारदरा समुहात 15 टीएमसी (78 टक्के) तर मुळा समुहात 14.5 टीएमसी (67टक्के) असा उपयुक्त पाणीसाठा आहे. तसेच जायकवाडीमध्ये 32.20 टीएमसी (42टक्के)पाणीसाठा आहे.

समन्यायी कायद्यात आधारभूत असलेल्या मेंढेगिरी अहवालाप्रमाणे पर्याय क्रमांक दोनसाठी दारणा समुहात 21.30 टीएमसी 84 टक्के, गंगापूर समुहात 8 टीएमसी 74टक्के, भंडारदरा समुहात 15 टीएमसी 78टक्के, मुळा समुहात 14.20 टीएमसी 65 टक्के तसेच जायकवाडी मध्ये 41.40 टीएमसी 54 टक्के पाणीसाठा असणे अपेक्षित आहे.

त्यामुळे सद्यस्थितीत दारणा गंगापूर समुहात पर्याय क्रमांक दोनमधील अटीची पुर्तता होईल एवढा पाणी साठा नाही. मुळा आणि भंडारदरा समुहातील पाणीसाठा पर्याय क्रमांक दोनची जेमतेम पूर्तता करीत आहे. परंतु जायकवाडीत अद्याप पर्याय क्रमांक दोनची पूर्तता होणेसाठी 10 टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे सध्या तरी अंशतः पाणी सोडण्याची मागणी होऊ शकते.

आतापर्यंत मान्सुनची वाटचाल पाहता, तौक्ते आणि यास या दोन चक्रीय वादळांनी मान्सुनच्या सुरवातीलाच आणलेला विस्कळीतपणा, अद्यापही पूर्व स्थितीला येऊ शकलेला नाही. मान्सुनच्या उर्वरित कालखंडात ती शक्यता दुरापास्त असल्याचे दिसून येत आहे. आजमितीस लाभक्षेत्रातील आणि पाणलोटक्षेत्रातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे. ओढे नाले न वाहिल्याने भूजलपातळी वाढलेली नाही. आता परतीच्या मान्सुनची अपेक्षा असली तरी त्यामुळे धरणात फारसी आवक होणार नाही. त्यामुळे अपेक्षित ओव्हर फ्लो ची शक्यता दिसत नाही.

सद्यपरिस्थितीत खरीपाची उभी पिके येतील. परंतु रब्बी आणि उन्हाळ हंगाम अडचणीत येईल असे वाटते. कमी पाणी लागणारी जसे हरभरा, चारा पिके ज्वारी सारखी पिके रब्बीत घेता येऊ शकतील.

समन्यायी प्रमाणे काही प्रमाणात जरी पाणी सोडणे आवश्यक ठरले तर पिण्याच्या पाण्याचे वर्षभराचे नियोजन करुन उर्वरित पाण्यात दारणा, गंगापूर तसेच मुळा प्रकल्पात दोन आणि भंडारदरा-निळवंडे समुहात तीन किंवा चार आवर्तने होऊ शकतील. अर्थात कर्मधर्मसंयोगाने पुढील काळात पाऊस झालाच तर यात सुधारणा होऊ शकते. त्यामुळे विहीरीची सक्षमता आणि कालव्याची संभ्याव्य आवर्तने यासंदर्भातील वास्तव चित्र विचारात घेऊनच रब्बी व उन्हाळ हंगामाचे नियोजन करणे, उचित राहिल. या माहितीला जलसंपदाचे सेवानिवृत्त कार्यकारी अधिकारी उत्तमराव निर्मळ यांनी दुजोरा दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post