करोनाची लाट ओसरताच शिर्डीकरांना निवडणुकीचे वेध


माय वेब टीम 

 शिर्डी | करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मिनी विधानसभा समजल्या जाणार्‍या ग्रामपंचायत निवडणुका वर्षाच्या सुरुवातीलाच पार पडल्यानंतर करोनाची दुसरी लाट उसळली होती. मात्र आता लाट ओसरताच शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीचे वेध शिर्डीकरांना लागले आहेत. सर्वेक्षणानुसार जुन्या चेहर्‍यांंना शहरवासियांची नापसंती असल्याने यावेळी या निवडणुकीत युवा पिढीला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढाई पाहायला मिळणार की अपक्ष बाजी मारून नेतात? शिर्डी नगरपंचायतीवर यंदाच्या निवडणुकीत कोणाचा झेंडा फडकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकांंचा बिगुल वाजला असून करोनाच्या तिसर्‍या लाटेवर निवडणुकांचे गणित निश्चित केले जाईल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून बांधण्यात येत आहे. दुसरी लाट पूर्णतः ओसरली नाही.आगामी काळात होऊ घातलेल्या शिर्डी नगरपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. देशविदेशात साईबाबांच्या चमत्काराने शिर्डी शहर जगाच्या नकाशावर झळकले आहे. त्यामुळे शिर्डीवर राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व राजकीय नेते मंडळींचे बारकाईने लक्ष असते. त्याचे कारण देखील तसेच आहे.

शिर्डी हे आंतरराष्ट्रीय शहर म्हणून नावारूपास आल्यानंतर नगरपंचायतने सलग दोनवेळा देश व राज्य पातळीवर स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावला असून नुकत्याच पार पडलेल्या राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावून लागोपाठ तीनवेळा पुरस्कार पटकावणारी शिर्डी नगरपंचायत ही राज्यातील एकमेव स्थानिक स्वराज्य संस्था ठरली आहे. मागील दोन दशकांपासून तत्कालीन काँग्रेसचे माजीमंत्री तथा सध्या भाजपवासी झालेले आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत निर्विवाद सत्ता राखली आहे.
शिर्डी नगरपंचायत 2014 च्या निवडणुकीत आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या चिन्हावर 17 पैकी 10 जागा मिळाल्या होत्या. यामध्ये भाजपला तीन, शिवसेना एक, अपक्ष दोन आणि मनसेला एक जागा असे 17 उमेदवार विजयी झाले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. विखे पाटील यांनी काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करून ते भाजपच्या तिकिटावर विजयी झाले. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत असले तरी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस या तीन पक्षांचे आघाडी सरकार असल्याने शिर्डी नगरपंचायतची निवडणूक विखे गटाला आगामी निवडणुकीत मोठी डोकेदुखी ठरणार आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारत नंबर एकचा पक्ष ठरला आहे. त्यापाठोपाठ नंबर दोनवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस. त्यामुळे आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर लोकांची पसंती आहे हे यातून दिसून येते. 2014 च्या निवडणुकीत शहरात एकूण 17 वॉर्ड होते. यामध्ये मतदारांची संख्या जवळपास 19 हजारांच्या आसपास होती. मात्र पाच वर्षांत शहरात लोकसंख्या वाढल्याने आता ती 29 हजारांच्या घरात जाऊन पोहचली आहे. वॉर्डरचनेत थोड्याफार प्रमाणात फेरबदल केले असून यावेळी वॉर्डाची संख्या 17 वरून 21 होणार असल्याचे अधिकृतपणे समजते. त्यामुळे आता तीन वॉर्ड वाढणार आहेत.

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसने आपापल्यापरीने वॉर्डनिहाय उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना फितवून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. यावेळच्या निवडणुकीत पाडापाडीचे राजकारण होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. नव्याने भाजपवासी झालेल्या विखे पाटील समर्थक व मूळ भाजपचा गट यांच्यात अद्यापही सूर मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे विखे पाटील आगामी निवडणुकीत दोन पॅनल उभे करतील अशी शक्यता आहे.

दुसरीकडे काँग्रेसच्यावतीने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा इशारा दिल्याने आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. याचा थोडाफार फायदा भाजपला होऊ शकतो. मात्र महाविकास आघाडीच्यावतीने एकत्रित निवडणूक लढविल्यास निवडणुकीत रंगत वाढणार आहे.

देशविदेशात साईबाबांच्या चमत्कारामुळे शिर्डीचा नगरसेवक या पदाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असल्याने निवडणुकीत विजयी होण्यासाठी अनेकांनी विविध प्रकारचे फंडे आजमावून जनतेला खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिर्डी नगरपंचायतीचा कार्यकाल संपत आला असून आगामी निवडणुका घेण्यासाठी कालावधी अल्पसा राहिला आहे. करोनाच्या तिसर्‍या लाटेने नगरपंचायतीची निवडणूक लांबली तर राजकीय इच्छुकांचा हिरमोड होईल परंतु आता करोनाचा असर कमी झाल्याने शहरातील इच्छुक निवडणुकीच्या कामाला लागले असून भेटीगाठीचे सत्र सुरू झाले आहे. यावेळच्या निवडणुका कसदार होणार असून मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी होणार आहे. त्यामुळे इच्छुकांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post