तिन्ही पक्षांची समन्वय यंत्रणा आहे सक्षम


माय वेब टीम 

मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येताना वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधील भावी मतभेदांचे निराकरण करण्यासाठी विशेष यंत्रणा नियोजित केलेली असते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तीनही राजकीय पक्षांसाठी अशी समन्वय यंत्रणा अस्तित्वात आहे. त्यामुळे मतभेदाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकार पडण्याची कुठलीही शक्यता नाही. सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा स्पष्ट निर्वाळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी बारामती येथे दिला.

राज्यातील आघाडी सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाहीत कारण सरकारची स्थापना होतानाच, भविष्यात निर्माण होणारे प्रश्न, मतभेदाचे मुद्दे सोडवण्यासाठी यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. आघाडीत कुठलाही प्रश्न निर्माण झाला की ही यंत्रणा कार्यान्वित होते. तिन्ही पक्षांचे सहकारी एकत्र येतात. चर्चा करून प्रश्न सोडवतात आणि एकमताने निर्णय घेतात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे निश्चितपणे राहणार, असे पवार यांनी स्पष्ट केले.

ईडी प्रकरण हेतुपुरस्सरपणे
दरम्यान, शरद पवारांनी या वेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीवरही भाष्य केले. हे प्रकरण हेतुपुरस्सरपणे करण्यात येत असल्याचेही शरद पवार यांनी सांगत इतर मुद्द्यावरही पत्रकारांशी चर्चा केली.

सर्वांनाच आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार
‘राजकारणाच्या क्षेत्रात प्रत्येक राजकीय पक्ष आपापली ताकद, शक्ती, संघटना वाढवण्याच्या प्रयत्नात असतो. त्यात वेगळे किंवा चुकीचे काहीच नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही राजकीय पक्षांना आपापली शक्ती, संघटना वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे हा मुद्दा मुळातच वादाचा नाही. आमच्यामध्ये सामंजस्य असून कुठलेही मतभेद नाहीत, असे पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांत मराठा, ओबीसी आरक्षण, प्रताप सरनाईकांचे पत्र आदी मुद्द्यांवरून सरकारच्या अस्तित्वाबद्दलची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर पवार यांनी बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post