मुंबई - निर्बंध शिथिल झाल्याने लोकल कधी सुरु होणार याची प्रतीक्षा मुंबईकरांना आहे. परंतु मुंबईत रुग्ण आटोक्यात येत असले तरी एमएमआर रिजन मधील रुग्ण संख्येचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच मुंबईतील रुग्णालयात ऑक्सिजन बेड्स व रुग्ण संख्या किती याचा आढावा घेत राज्य सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. त्यामुळे सर्वसामान्यांना लोकल सुरु होण्याची गुरुवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये ७ जूनपासून राज्य सरकारने शिथिलता दिली आहे. यासाठी पाच स्तर तयार करण्यात आले असून त्यानुसार निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाते आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ५.२५ वरून ४.४० टक्के झाल्याने सद्या मुंबईचा समावेश दुसऱ्या स्तरात झाला आहे.
मात्र नियम तिसऱ्या स्थरातीलच लागू आहेत. त्यामुळे सर्वांसाठी लोकल सुरु करण्यासाठी कोरोना स्थितीचा अंदाज घेत आहे. मुंबईत नोकरीनिमित्त व इतर कारणासाठी मुंबईसह मुंबई शेजारील शहरांमधील येणाऱ्या लोकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे लोकल सुरु करताना फक्त मुंबईच नाही, तर संपूर्ण एमएमआर क्षेत्रातील कोरोना स्थितीचा विचार करावा लागणार आहे. त्यानुसार येत्या गुरुवारी एमएमआर क्षेत्रातील मुंबईसह शेजारच्या ठाणे, नवीमुंबई विभागातील कोरोना रुग्णांचा आढावा घेतला जाणार आहे. पॉझिटिव्हिटी रेट व इतर स्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
Post a Comment