मी देवेंद्र फडणवीसांची भेट घेईन, संन्यास घेऊ देणार नाही

 


माय वेब टीम 

मुंबई - राजकीय संन्यास घेण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, असं राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. याच विषयावर आजचा सामनाचा अग्रलेखही आहे. फडणवीसांनी फकीर होण्याची भाषा करणं योग्य नाही, असंही ते बोलताना म्हणाले.

देशात, राज्यात फार कमी चांगली नेतृत्व आहेत. फडणवीस त्यापैकी एक आहेत. त्यामुळे त्यांनी संन्यास घेतला तर भारतीय जनता पार्टीचं तसंच जनतेचंही मोठं नुकसान होईल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून भाजपानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण पुर्नप्रस्थापित करण्यासाठी भाजपाकडून राज्यभर चक्का जाम आंदोलनही करण्यात आलं.

याच आंदोलनाच्या दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली होती. ‘इतकंच नाहीतर सत्ता द्या तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण देईन; नाहीतर राजकारणातून कायमचा संन्यास घेईन’, असा दावाही केला. फडणवीस यांनी केलेल्या राजकीय संन्यासाच्या दाव्याचा शिवसेनेनं समाचार घेतला आहे. “बावनकुळेंचे कौतुक आज भाजपा करीत आहे, पण ओबीसींचे नेते बावनकुळे यांच्या आमदारकीचे तिकीट कापून ‘ओबीसी’ नेतृत्वाचे पंख कापणारे हात कोणाचे होते, हेसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळूद्या!,” असा टोलाही शिवसेनेनं भाजपाला लगावला.

तर आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखामधूनही राऊतांनी फडणवीसांवर खोचक टीका केली आहे. “आज रस्त्यांवर गर्दी जमवून आदळआपट करून काय साध्य करणार? भाजपा व त्यांचे पुढारी विद्वान आहेत, कायदेबाज आहेत. त्यामुळे सरकारच्याच बरोबरीने ओबीसी आरक्षणाची लढाई त्यांनी सुरूच ठेवावी व ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यास हातभार लावावा. आम्हाला चिंता मराठा आणि ओबीसी आरक्षणाची आहेच, पण फडणवीस यांनी केलेल्या राजकीय संन्यास घेण्याच्या घोषणेचीदेखील आहे. फडणवीसांनी असा त्रागा करून घेऊ नये. सर्वकाही सुरळीत व त्यांच्या मनाप्रमाणे होईल. संन्यास घेतील त्यांचे दुष्मन!,” अशा शब्दात शिवसेनेनं फडणवीसांना चिमटे काढले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post