वेगळी बातमी! रक्तदान करा, १ किलो पनीर, चिकन मिळवा

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई: गरजू रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये म्हणून रक्तदान शिबीर घेणे ही तशी नित्याची बाब झाली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे व राजकीय पक्ष अशी शिबिरे आयोजित करत असतात. मात्र, शिवसेनेच्या माहीम-वरळी शाखेनं आयोजित केलेलं रक्तदान शिबीर सध्या मुंबईत चर्चेचा विषय ठरलं आहे. त्याला कारणही तसंच आहे.

कोविड महामारीच्या काळातील वैद्यकीय आणीबाणीमुळे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई भासू लागली आहे. हे लक्षात घेऊन शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर यांनी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास एक किलो चिकन देण्यात येणार आहे. रक्तदाते शाकाहारी असल्यास त्यांना एक किलो पनीर देण्यात येणार आहे. तसे बॅनर स्थानिक भागांत झळकले आहेत.

रविवार, १३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत न्यू प्रभादेवी रोडवरील राजाभाऊ साळवी मैदानात हे रक्तदान शिबीर होणार आहे. त्यासाठी ११ डिसेंबरपूर्वी नोंदणी करायची आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. अधिकाधिक संख्येनं लोकांनी रक्तदान करावं, एवढाच यामागचं उद्देश असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post