'अजित पवार यांची ताकद असती तर...'; चंद्रकांत पाटलांचं डिवचणारं विधान

 


माय अहमदनगर वेब टीम

शिर्डी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे मातब्बर नेते अजित पवार यांनी गेल्यावर्षी केलेलं बंड फसल्याने देवेंद्र फडणवीस यांची अभूतपूर्व अशी राजकीय फजिती झाली होती. अजितदादांनी साथ सोडल्याने अवघ्या ८० तासांत फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. या सत्तानाट्याला वर्ष लोटल्यानंतरही भाजपच्या राज्यातील नेत्यांमधील अस्वस्थता कायम असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले आहे. त्यातूनच गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ नुकताच पूर्ण केला आहे. सरकार भक्कम असल्याचा विश्वास शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते व्यक्त करत आहेत. हीच बाब सरकार कोसळण्याची वाट पाहत बसलेल्या भाजपसाठी अस्वस्थता वाढवणारी ठरली आहे. त्यात निवडणुकीवेळी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना माघारी फिरण्यासाठी अजित पवार यांनी साद घातल्याने व भाजपमधील काही आमदार नाराज असल्याचे विधान केल्याने चंद्रकांत पाटील यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.


'अजित पवार यांची ताकद असती व त्यावेळी सोबत आणलेले आमदार त्यांना सांभाळता आले असते तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार टिकलं असतं. ते सरकार ८० तासांचं ठरलं नसतं', अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना डिवचलं. भाजपमधील काही आमदार नाराज असल्याच्या दाव्याचा त्यांनी समाचार घेतला. तुमचं आघाडी सरकार चांगलं चाललंय तर मग आमच्या आमदारांना तुम्ही आकर्षिक कशाला करताय?, असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. राष्ट्रवादीत लवकरच महाभरती होणार या जयंत पाटील यांच्या विधानाची चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली. तुम्ही सरकार चालवा, आम्ही विरोधी पक्ष सांभाळू, असा टोला पाटील यांनी लगावला. शिर्डी येथे साईबाबा मंदिरात दर्शनासाठी आले असता पाटील माध्यमांशी बोलत होते.


काय म्हणाले होते अजित पवार?


विधानसभा निवडणुकीवेळी काही नेत्यांना प्रलोभने दाखवून तर काही जणांना भीती दाखवून फोडण्याचे काम भाजप  नेतृत्वाने केले. राज्यात आघाडीचे सरकार येणार नाही, असे वाटल्याने तेव्हा अनेकांनी भाजपमध्ये प्रवेशही केला. मात्र, आता स्थिर सरकारमुळे आपण आघाडी का सोडली असा प्रश्न या नेत्यांना पडला आहे, असे नमूद करत या नेत्यांना अजित पवार यांनी माघारी फिरण्यासाठी साद घातली आहे. जे कुणी भाजपचा व आमदारकीचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांना तिन्ही पक्ष मिळून निवडून आणण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वासही अजित पवार यांनी दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post