या वाईट सवयींमुळे ३० वर्षांचे तरुणही करताहेत टक्कल पडण्याच्या समस्येचा सामना

 


माय अहमदनगर वेब टीम

हेेल्थ डेस्क - केसगळती ही एक सामान्य समस्या आहे. पण अति प्रमाणात केस गळत असतील तर यावर वेळीच उपाय करणं आवश्यक आहे. महिलांप्रमाणेच पुरुष मंडळी देखील केसगळतीमुळे त्रस्त असतात. ज्या तरुणांचे केस जास्त गळत आहेत, त्यांनी वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास टक्कल पडू शकते. लहान वयातच टक्कल पडणं ही समस्या गंभीर असू शकते. यामागील कारणं असंख्य असू शकतात. त्यांचा शोध घेणे आवश्यक आहे. 

बदलती जीवनशैली आणि काही वाईट सवयींमुळे आपल्या केसांच्या आरोग्यावर थेट दुष्परिणाम होतात. घनदाट आणि काळेशार केस हवे असतील तर त्वचेप्रमाणेच केसांचीही योग्य पद्धतीने देखभाल करावी. कोणत्या कारणांमुळे केसगळती होऊ शकते? जाणून घेऊया.

गरम पाण्याने आंघोळ करणं

गरम पाण्याने आंघोळ केल्यानं आपल्या टाळूच्या त्वचेचं प्रचंड नुकसान होतं. गरम पाण्यामुळे त्वचेवरील नैसर्गिक ओलावा कमी होते, ज्यामुळे टाळूची त्वचा कोरडी होऊ लागते. कोरड्या त्वचेमुळे कोंड्याचीही समस्या निर्माण होते. गरम पाण्यामुळे टाळूच्या रोमछिद्रांवर परिणाम होतो आणि केस पातळ देखील होऊ लागतात.

​मद्यपान आणि धूम्रपान

मद्यपान आणि धूम्रपानामुळे केसगळती मोठ्या प्रमाणात होते, ही बाब कित्येक संशोधनामध्ये सिद्ध झाली आहे. सिगारेट आणि दारूमधील हानिकारक घटकांमुळे टाळूच्या त्वचेवरील रोमछिद्र तसंच हार्मोनावर वाईट परिणाम होतो. याव्यतिरिक्त धूम्रपान आणि मद्यपान केल्यानं केस पांढरे देखील होऊ लागतात.

​​केसांना तेल न लावणे

नियमित स्वरुपात केसांचा तेलाने मसाज केल्यास आपल्या टाळूला महत्त्वपूर्ण व्हिटॅमिन आणि पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो. यासाठी आयुर्वेदिक तेलाने केसांचा मसाज करावा. तेल मसाजमुळे केसगळती आणि पांढऱ्या केसांची समस्या रोखण्यास मदत मिळते. पण हल्ली धकाधकीच्या जीवनात अनेक जण केसांना तेल लावणे टाळतात.

हीटिंग टुलचा अधिक वापर करणं

केसांसाठी नियमित हीटिंग टुलचा वापर करणं किंवा सातत्यानं हेअर स्टायलिंग प्रोडक्टचा वापर करणं; केसांच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. यामुळे केसांचे भरपूर नुकसान होतं. हेयर ड्रायर, कलर ट्रीटमेंट आणि स्ट्रेटनर यासारख्या हीटिंग टुलच्या अति वापरामुळे केस कोरडे होऊ लागतात. परिणामी केस तुटणे आणि केसगळती मोठ्या प्रमाणात होऊ लागते.

चुकीच्या पद्धतीनं कंगवा करणे

केस ओले असताना कधीही कंगवा करू नये. यामुळे केस जास्त प्रमाणात तुटतात. केस ओले असताना आपण जोर देऊन कंगवा केल्यास केसांच्या मुळांवर वाईट परिणाम होतात. याऐवजी बोटांच्या मदतीने केसांचा गुंता सोडवावा.

न जेवण्याची वाईट सवय

काही जण वेळेवर जेवत नाहीत किंवा जेवण करणं टाळतात. यामुळे केसगळती अधिक प्रमाणात होते. संशोधनातील माहितीनुसार, संपूर्ण दिवस उपाशी राहणं आणि वेळेवर न जेवल्याने आपल्या शरीराची सर्व ऊर्जा अन्य आवश्‍यक कार्य उदाहरणार्थ हृदय आणि मेंदूचे कार्य करण्यातच खर्च होते. यामुळे केसांची वाढ होत नाही. नवीन केस येण्यासाठी तसंच केसांची वाढ होण्यासाठी प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन करावे. यासाठी डाएटमध्ये डाळी, मासे, अंडे इत्यादी पौष्टिक घटकांचा समावेश करावा.

NOTE केसांशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post