भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : नगर अर्बन बॅंकेतील तीन कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी माजी संचालक राजेंद्र गांधी व पोपट लोढा यांच्या नेतृत्त्वाखाली बॅंकेच्या सभासदांनी प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यामुळे प्रशासक मिश्रा यांनी बॅंकेच्या मुख्य शाखेचे शाखाधिकारी मारूती औटी यांना फिर्याद देण्यास सांगितले. त्यानुसार माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नगर अर्बन बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी माजी खासदार तथा बॅंकेचे माजी अध्यक्ष दिलीप गांधी, तत्कालीन शाखा अधिकारी घनशाम अच्च्युत बल्लाळ, कर्जदार आशुतोष सतिश लांडगे आदींवर संगनमताने कट रचून बॅंकेची तीन कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मारूती औटी यांनी दिली.
भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने बॅंकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, की 7 ऑक्टोबर 2017 ते 10 डिसेंबर 2020 या दरम्यान बॅंकेचे माजी अध्यक्ष दिलीप मनसुखलाल गांधी (रा. आनंदऋषी मार्ग, नगर), मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनश्याम अच्युत बल्लाळ (रा. अर्बन बॅंक कॉलनी, सावेडी, नगर), कर्जदार टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजीचे आशुतोष सतीश लांडगे (रा. वेदांतनगर, सावेडी, नगर) व संचालक मंडळ सदस्य यांनी कट रचून, संगनमताने बॅंकेस खोटे कागदपत्र तयार करुन बॅंकेच्या तीन कोटी रूपयांच्या रकमेचा अपहार केला. यात ठेवीदार, सभासद यांचा विश्वासघात केला आहे. तीन कोटी रुपयांची रक्कम या आर. बी कासार, देवी एजन्सी व गिरीराल एंटरप्राइजेस यांच्या खात्यात वर्ग करुन त्यांच्या खात्याद्वारे काढून घेत बॅंकेची फसवणूक केली आहे.
संबंधितांनी स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करुन अवास्तव कर्ज मंजूर केलेले आहे. त्याद्वारे बॅंकेच्या रकमेची चोरी, अफरातर व फसवणूक केली आहे. याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोजन महाजन करत आहेत.
Post a Comment