राज्यकर्त्यांना घराबाहेर पडण्याचे धाडस होईना!; पाटलांची जोरदार फटकेबाजी

 


माय अहमदनगर वेब टीम

लातूर: मराठा आरक्षण, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना, करोना प्रसारामुळे आर्थिक संकटात सापडलेले बारा बलुतेदार अशा वेगवेगळ्या प्रश्नांची सविस्तर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचे १५ दिवसांचे अधिवेशन घ्या, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

लातूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. राज्यकर्त्यांना घरातून बाहेर पडण्याचे धाडस नसल्याने विधिमंडळाचे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय झाला अशा आरोप करताना अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत झालेली वाढ, गतीमंद-मतीमंद मुलींवरील अत्याचार, मराठा आरक्षण अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी १५ दिवसांचे अधिवेशन घेणे गरजेचे आहे, असे पाटील म्हणाले. मध्यंतरी घेतलेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनात विरोधकांकडून होणारी टीका ऐकावी लागू नये म्हणून वेगवेगळया क्लुप्त्या सत्ताधारी पक्षाने लढवल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात अडथळे आणायचे आणि सभागृहाचे कामकाज अर्धा अर्धा तास तहकूब करायचे असल्या खेळ्या सत्ताधाऱ्यांनी केल्या. परिणामी राज्यापुढील अनेक प्रश्नांवर विधिमंडळात गांभीर्याने चर्चाच होऊ शकली नाही, असेही पाटील यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, करोना काळात सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे झालेले मृत्यू यासारख्या मुद्द्यांवरून सरकार पळ काढत आहे. राज्यापुढे असलेल्या विविध प्रश्नांवर सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आम्ही जोरदार संघर्ष करणार आहोत. हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार नसल्याने आता मार्चमध्ये नागपुरात विधिमंडळ अधिवेशन घ्या आणि नागपूर अधिवेशनाला कायदेशीर स्वरूप द्या, अशी मागणीही पाटील यांनी केली. औरंगाबाद पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण घुगे आणि समीर दुधगावकर यांची निवडणूक सह प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सर्वानुमते झाला निर्णय

राज्यातील करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दि. ७ डिसेंबरपासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीमध्ये आज घेण्यात आला. मुंबईत विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आयोजित करण्यात येते, पण सध्या जगावर, देशात आणि राज्यावर असलेले करोनाचे संकट आणि राज्यातील करोनाची परिस्थिती पाहता नागपूरऐवजी हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दि. ७ डिसेंबरला अधिवेशन घेता येईल का आणि किती दिवस घ्यायचे याबाबतही या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. बैठकीत हिवाळी अधिवेशनासाठी लागणाऱ्या सुविधांचाही आढावा घेण्यात आला. अनेक विधिमंडळ सदस्यांनी नागपूर येथे कोविडच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन घेणे उचित होणार नाही अशा सूचना यावेळी केल्या. बैठकीला विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे) संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post