तिरंग्याला विरोध करणाऱ्या मुफ्तींबरोबर सत्ता भोगणाऱ्या भाजपने देशभक्ती शिकवू नये : थोरात

 


माय अहमदनगर वेब टीम

संगमनेर -'जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तिरंग्याच्या विरोधात विधान केले होते. त्यावेळी भाजप त्यांच्या बरोबर सत्तेत होता. काँग्रेसने यासंदर्भात त्यांचा राजीनामा मागितला होता. त्यावेळी मेहबुबा मुफ्तींसोबत काश्मीरची सत्ता उपभोगताना भाजपने आपले देशप्रेम खुंटीला टांगून ठेवले होते का?' असा संतप्त सवाल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. याचबरोबर त्यांनी मेहबुबा मुफ्तींबरोबर सत्ताभोगणाऱ्या भाजपने इतरांना देशभक्ती शिकवू नये अशी घणाघाती टीका केली आहे.

विधान सभेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लरेशन मध्ये सहभागी आहे असे खोटे विधान केले आहे. काँग्रेस पक्ष हा गुपकर डिक्लरेशन मध्ये सहभागी नाही. काँग्रेस पक्षाचा गुपकर डिक्लरेशनशी कोणताही संबंध नाही. मात्र फडणवीस यांना काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लरेशनमध्ये सहभागी आहे असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसवर आरोप करण्याच्या नादात आपण खोटे बोलत आहोत याचे भानही त्यांना राहिले नाही. बोलण्याच्या अगोदर त्यांनी जरा माहिती घेतली असती तर बरे झाले असते असे म्हणत थोरातांनी फडणवीसांना चिमटा काढला.

'काँग्रेस पक्षाने या देशाच्या स्वातंत्र्याची लढाई लढली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. देशप्रेम हे काँग्रेसच्या नसानसात भिनलेले आहेत. स्वातंत्र्यांच्या लढ्यात ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये. मेहबुबा मुफ्ती यांनी तिरंग्याच्या विरोधात विधान केले, ५२ वर्ष आपल्या मुख्यालयात तिरंगा न फडकवणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक फडणवीस आता विलाप करत आहेत. २०१७ साली याच मेहबुबा मुफ्ती यांनी तिरंग्याच्या विरोधात विधान केले होते, त्यावेळेला भाजप त्यांच्या बरोबर सत्तेत होता. काँग्रेसने यासंदर्भात त्यांचा राजीनामा मागितला होता तेव्हा मात्र भाजप सत्तेला चिकटून बसली होती. हेच त्यांचे स्ट्रॅटेजीक अलायन्स होते का?' असा संतप्त सवाल थोरात यांनी केला.

काश्मीरमध्ये लोकशाही अस्तित्वात रहावी आणि भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर यावा यासाठी काँग्रेस पक्ष तेथील निवडणुकांमध्ये सहभागी झाला आहे. त्याचा गुपकर डिक्लरेशनशी कोणताही संबंध नाही असे ही काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष  थोरात यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीर प्रश्नी पुन्हा एकदा  काँग्रेस पक्षावर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. खोटे बोलण्याच्या व जनतेला फसविण्याच्या सवयीमुळे जनतेने भाजपला सत्तेपासून दूर केले. मात्र भाजप नेत्यांची खोटे बोलण्याची सवय अद्याप गेलीली नाही.  

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post