वाढीव वीज बिलांविरोधात मनसेचे राज्यव्यापी आंदोलन

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - वाढीव वीज बिलांविरोधात मनसेने उद्या राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. वाढीव वीज बिलांनी त्रस्त झालेल्या जनतेला न्याय देण्यासाठी उद्या संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चे आयोजित केले आहेत. संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येणार आहेत. एकाच वेळी संपूर्ण राज्यात निघणाऱ्या या मोर्चांमध्ये सामान्य जनताही सहभागी होणार असल्याचं मनसेने सांगितलं आहे. वाढीव वीज बिलांच्या होळीचं आंदोलन भाजपाने सोमवारी राज्यभरात केलं. आता त्यांच्या पाठोपाठ मनसेनेही उद्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.


वाढीव वीज बिलांच्या प्रश्नावरच्या आंदोलनात सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी भाजपानंतर आता मनसेनेही उडी घेतली आहे. उद्या राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांवर राज ठाकरेंच्या मनसेच्या वतीने सरकारला जाग आणण्यासाठी या मोर्चांचं आयोजन करण्यात आलं आहे. संपूर्ण राज्यात करोनामुळे लॉकडाउनच्या कालावधीत झालेल्या विजेचा वापर जास्त झाल्याचे कारण देत महावितरणने राज्यातील जनतेला वाढीव वीज बिलं पाठवली. या वीज बिलांमध्ये सवलत दिली जाईल असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. मात्र नंतर वीज वापरली आहे तेव्हा सवलत मिळणार नाही बिलं भरावीच लागतील अशी भूमिका घेतली. यामुळेच जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मनसेने आता आंदोलनाची हाक दिली आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post