थंडीत बॉडी मसाज का करावा, आयुर्वेदानुसार कोणते तेल वापरल्यास मिळतील जास्त लाभ? जाणून घ्या

 


माय अहमदनगर वेब टीम

हेेल्थ डेस्क - थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराची देखभाल करणं अतिशय आवश्यक आहे. स्नायू मजबूत राहण्यासाठी आणि त्वचा चमकदार दिसण्यासाठी शरीराचा तेलाने मसाज करावा. आयुर्वेदातील माहितीनुसार हिवाळ्यात गरम तेलाने मसाज करणं आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. 

थंडीमध्ये आठवड्यातून तीन वेळा बॉडी मसाज करणं अत्यावश्यक मानले जाते. मसाजमुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहतो. यामुळे सर्दी-खोकल्यापासून शरीराचे संरक्षण देखील होण्यास मदत मिळते. कोणत्याही नैसर्गिक तेलाच्या मदतीने आपण बॉडी मसाज करू शकता. पण मसाज करण्यासाठी काही खास आयुर्वेदिक तेलांचा उपयोग केल्यास आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं. जाणून घ्या या तेलांची सविस्तर माहिती.

​तिळाचे तेल

आयुर्वेदातील माहितीनुसार हिवाळ्यामध्ये तिळाच्या तेलाचा वापर करणं चांगले मानले जाते. हे तेल आपली त्वचा अतिशय सहजरित्या शोषून घेते. तिळामध्ये भरपूर प्रमाणात पोषण तत्वांचा समावेश आहे. ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. संशोधनातील माहितीनुसार तिळामध्ये नैसर्गिक स्वरुपात एसपीएफ ६ सनस्क्रीन गुणधर्म आहेत.

​ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमध्ये कित्येक प्रकारच्या व्हिटॅमिन आणि खनिजांचा समावेश आहे. हे गुणधर्म थंडीच्या दिवसात आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझर प्रमाणे कार्य करतात. हे तेल ओल्या त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करावा. कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी हे ते अतिशय लाभदायक आहे. यामध्ये अँटी ऑक्सिडंट देखील मोठ्या प्रमाणात आहेत.

​बदाम तेल

त्वचा तसंच केसांची देखभाल करण्यासाठी बदामाच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बदाम तेलाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास आपल्या त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते. या तेलामुळे त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझर मिळते. यामुळे त्वचेचा रंग आणि पोत चांगला राहतो.

​नारळाचे तेल

नारळाचे तेल त्वचेसाठी अतिशय लाभदायक मानले जाते. कारण यातील पोषण तत्त्व त्वचेचं बॅक्टेरियांपासून संरक्षण करतात. नारळाच्या तेलामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. या तेलाने मसाज केल्यास शरीरात रक्तप्रवाह चांगल्या पद्धतीने सुरू राहतो.

​अळशीचे तेल

या तेलामध्ये ओमेगा ६ फॅटी अ‍ॅसिड आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात आहेत. यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहते आणि त्वचेचा रंग देखील उजळतो. आपण या तेलाचा स्वयंपाकामध्येही समावेश करू शकता. थंडीच्या दिवसात या तेलानं शरीराचा मसाज केल्यास त्वचा मऊ आणि चमकदार होते. त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत मिळते. या तेलाचा आपण मॉइश्चराइझिंग लोशनच्या स्वरुपातही वापर करू शकता.

​मोहरीचे तेल

आपल्या देशामध्ये मोहरीच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. काही जण आंघोळ करण्यापूर्वी या तेलानं शरीराचा मसाज करतात. तेलामधील मॉइश्चराइझिंग गुणधर्म त्वचा मऊ आणि चमकदार ठेवण्याचे कार्य करतात. थंडीच्या दिवसांत शरीराचा मसाज करण्यासाठी हे तेल सर्वोत्तम पर्याय आहे.

NOTE त्वचेशी संबंधित कोणतेही उपचार करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post