माय अहमदनगर वेब टीम
मुंबई: राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात 'लेटरवॉर' भडकलं असताना महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतला आहे.
राज्यपाल कोश्यारी यांचं पत्र संविधानाची चौकट मोडणारं असल्याचं परखड मत व्यक्त करतानाच धार्मिक स्थळे उघडली नाहीत म्हणून 'सेक्युलर' ठरवून अवहेलना करणार का? असा सवालच शरद पवार यांनी या पत्रात विचारला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात ज्या भाषेचा प्रयोग केला आहे तो धक्कादायक आहे. राज्यपालांना अशी भाषा शोभत नाही, अशी तक्रारच शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत मात्र धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर आज भाजपने राज्यव्यापी आंदोलन केलं. एकीकडे हे आंदोलन सुरू असतानाच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून धार्मिक स्थळे खुली करण्याची सूचना केली आणि त्यासोबतच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाचीही आठवण करून दिली. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेचच ठाकरी भाषेत उत्तर दिलं असताना शरद पवार यांनी या सगळ्या घटनाक्रमाकडे थेट पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे.
Post a Comment