खडसे पक्षांतर करणार का? मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले

 


माय अहमदनगर वेब टीम

धी, नगर: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, ‘एकनाथ खडसे हे भाजप सोडून कुठेही जाणार नाही,’असे स्पष्ट मतच आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मांडले. ते प्रवरानगर येथे बोलत होते. 

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबध्द केलेल्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे आज प्रकाशन झाले. या कार्यक्रमासाठी दानवे हे प्रवरानगर येथे आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना खडसेंबाबत वक्तव्य करीत त्यांच्या दुसऱ्या पक्षातील प्रवेशांच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. दानवे म्हणाले, ‘एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासोबत मी सतत बोलत असतो. मी त्यांच्या संपर्कात आहे. भाजप वाढविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. आता पक्षामध्ये एखाद्याला संधी मिळत असते एखाद्याला मिळत नाही. मात्र, खडसे यांना नक्की संधी मिळेल, त्यांना काही आम्ही वाळीत टाकले नाही. ते भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत.’ 

राज्यातच मंदिरे बंद का? दानवे

राज्यात बार उघडले, मॉल उघडले, एसटी बसेस सुरू झाल्या. त्यामुळे आता मंदिरे उघडली जावीत, ही भारतीय जनता पक्षाची स्पष्ट मागणी आहे. या राज्यातील सामान्य जनतेची सुद्धा मागणी आहे. फार तर तेथे सोशल डिस्टन्सिंगचे अंतर ठेवावे. आता सर्व ठिकाणी अनलॉक सुरू झाले आहे, त्यामुळे मंदिरे पण उघडली पाहिजेत,’ असेही दानवे यांनी स्पष्ट केले. ‘राज्यपाल यांनी मुख्यमंत्री यांना मंदिर उघडण्याबाबत पत्र लिहिले याचा अर्थ असा होतो की, राज्यपाल यांना सुद्धा वाटत आहे राज्य सरकारने आता जनतेचा अंत पाहू नये,असं दानवे म्हणाले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post