पैशाचं सोंग आणता येत नाही, शेतक-यांच्या मदतीसाठी मुंबईत काम सुरू

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई  - मी सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही. जे करू शकत नाही, ते बोलत नाही आणि जे बोलतो ते करतोच, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उस्मानाबादमधील पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले. मी इथे तुमच्याशी बोलत आहे, पण शेतक-याच्या मदतीसाठी मुंबईत काम सुरू आहे. शेतक-यांचं नुकसान मी केवळ इथं येऊन पाहिलं नाही, तर मी मुंबईतूनही पाहिलं आहे. मी इथे शेतक-यांना धीर द्यायला आलोय, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

जे करायचंय ते ठोस करू, दसरा-दिवाळीचा सण तोंडावर आहे. शेतक-यांच्या डोळ्यातील अश्रू पाहवत नाहीत. कोणतंही सोंग करता येतं, पैशाचं नाही. केंद्राकडे जीएसटीचे पैसे थकित आहे, ते अद्याप आलेले नाहीत. शेतक-यांना शक्य ती, जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असून मुंबईत त्याचं काम सुरू आहे. येत्या दोन दिवसांत मदतीसंदर्भात घोषणा करू, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. आपली व्हिडिओ क्लीप व्हायरल होतेय, त्यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी ज्यावेळी हे बोललो होतो तेव्हा राज्यात कोविडचं संकट नव्हतं. त्यावेळी, केंद्राकडे राज्याची जीएसटीची रक्कम थकलेली नव्हती. तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती वेगळी असल्याचं ठाकरेंनी सूचवलं आहे.

दरम्यान मी इथे आकडा जाहीर करायला आलेलो नाही, तर तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शेतक-यांनी धीर सोडू नये. या संकटावर आपण नक्की मात करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तुमच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडण्याचं काम याआधीही मी केलं आहे. तुमच्या आशीर्वादामुळेच मी मुख्यमंत्री झालो. माझं कर्तृत्व शून्य आहे, असं मुख्यमंत्र्यांनी उस्मानाबादमधील शेतक-यांशी संवाद साधताना म्हटले. ‘यंदाचं वर्ष संकटांचं आहे. वर्षाची सुरुवातच कोरोना महामारीनं झाली. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळानं हाहाकार माजवला. आता, परतीच्या पावसानं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. आधी कधीही झाला नव्हता इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे अगदी होत्याचं नव्हतं झालं आहे. मात्र, आपण या परिस्थितीतूनही सावरू. पण तुम्ही धीर सोडू नका,’ अशी साद मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना घातली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post