धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जय मल्हार सेनेचे अर्ध जलसमाधी आंदोलन

 



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर :- भारतीय राज्य घटनेतील तरतुदी नुसार महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जय मल्हार सेनेच्या वतीने गुरुवार दि. २२ ऑक्टोबर पासून राज्यव्यापी अर्ध जलसमाधी आंदोलन करणार असल्याची माहिती जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या पत्रकार परिषदेस जय मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख प्रदिपराज भोंडे, राज्य समिती सदस्य काशिनाथ आरगडे, जिल्हा संघटक सोपानराव कांदळकर, संगमनेर तालुका प्रमुख गंगाधर साळवे, बाळासाहेब घोडे, संतोष कांदळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 


यावेळी बोलतांना लहुजी शेवाळे म्हणाले की, भारतीय राज्य घटनेतील अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर असलेले धनगर हीच महाराष्ट्रातील धनगर जमात असल्याचे केंद्र व राज्य सरकारच्या अनेक दस्त ऐवजातून सिद्ध झाले आहे. व ते सर्व राज्य कर्त्यानी मान्य केलेले आहे. परंतु केवळ राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे गेल्या २५ वर्षांपासून धनगर समाज आरक्षणपासून वंचित आहे. 


धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या २५ वर्षांपासून धनगर समाजाच्या विविध संघटना लोकशाही मार्गाने आंदोलने करून राज्य शासनाचे लक्ष वेधत आहेत. परंतु महाराष्ट्र शासन धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे जाणीवूर्वक दुर्लक्ष करीत आहे. ही दीड कोटी धनगर समाजाची फसवणूक आहे. त्यामुळे राज्यातील धनगर समाज आता गप्प बसणार नसून गुरुवार दि. २२ ऑक्टोबर पासून राज्यभर जय मल्हार सेनेच्या वतीने अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील राहता, संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव, राहुरी, व पाथर्डी तालुक्यातील ३५ गावांमध्ये त्या त्या गावाजवळील नदी, बंधारे व तलाव या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे. जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे व समन्वयक विठ्ठलराव रबदडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदिपराज भोंडे, रेवननाथ शिंदे, संजय राऊत, बाळासाहेब घोडे आदी पदाधिकारी या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post