चाळीशीतल्या आरोग्य समस्या
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - घरातील प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तरच संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील. करिअर, चूल आणि मुल तसेच संसारात स्वत:ला कायम गुंतवून घेणार्या महिला स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. त्यामुळे पुढे या महिलांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी चाळीशीचा काळ म्हणजे जेव्हा खर्या अर्थाने स्त्रिया आपले स्वत:चे जीवन जगू लागतात, असे म्हणता येईल. याचे कारण म्हणजे ही वेळ अशी असते जेव्हा घरातील मुले मोठी होतात आणि स्वत: ची देखभाल करण्यासाठी ती सक्षम बनतात. आपल्या करिअरमध्येही त्या उच्च पदावर पोहोचलेल्या असतात, त्यामुळे करिअरच्या बाबतीतही त्या समाधानी असतात.
या वयात स्त्रियांच्या शरीरातील हार्मोन्स थोड्या प्रमाणात असंतुलीत झाल्याचे दिसून येते. यापूर्वीची कित्येक वर्षे केवळ करिअर आणि कुटुंबामध्ये गुंतवून घेणार्या या स्त्रियांना चाळीशीमध्ये आरोग्यविषयी समस्या जाणवू लागतात. यापूर्वी स्वतःच्या आरोग्याला फारसे महत्त्व न दिल्याने या महिलांना चाळीशीत आरोग्याकडे पुरेपूर लक्ष देण्याची गरज असते. स्त्रीच्या शरीरांतर्गत होणारे बदल हे स्त्रीच्या शरीरावर आणि मनावर परिमाण घडवून आणणारे असतात. काही स्त्रियांमध्ये या बदलाची तीव्रता कमी असते, परंतु बर्याच स्त्रियांना तीव्र वेदना सोसाव्या लागतात. या काळात आपले आरोग्य आणि मानसिक स्थितीची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण आपण संपूर्ण कुटुंबाचा मुख्य आधार असतो. जर घरातील स्त्री निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहू शकते.
चाळीशीतील आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्यासाठी महिलांनी खालील गोष्टींचे पालन करायला हवे.
संतुलित आहाराचे सेवन करावे. ताजी फळे, भाज्या, शेंगा आणि सर्व प्रकारच्या धान्यांचा आहारात समावेश करावा. मसालेदार, तेलकट, जंक फुड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा. धूम्रपान तसेच मद्यपानाचे सेवन टाळावे.
दररोज व्यायाम करावा. झुम्बा, चालणे, एरोबिक्स, पोहणे, जॉगिंग, व्यायाम प्रकारातील कोणताही आवडीचा व्यायाम करावा. हे आपणास रोगमुक्त राहण्यास मदत करेल.
तणावमुक्त राहा. कामाचा तणाव, कुटुंब आणि इतर जबाबदार्या हाताळण्यामुळे ताणतणावाचा त्रास होऊ शकतो. एकाच वेळी इतर काम केल्याने तणाव निर्माण होऊ शकतो. यावर आपल्याला योगाभ्यास आणि ध्यान यासारख्या तणामुक्त करणार्या सवयी लावून घेणे फायदेशीर ठरेल.
आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे आजारपण, त्यांच्या आरोग्याबद्दल आपण नेहमी जागरूक असावे. त्यामुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला असलेले आजारपण, त्याबाबत घ्यावी लागणारी काळजी याविषयी देखील आपण विशेष खबरदारी घ्यावी. जेणेकरून भविष्यात काही अडचणी आल्यास आपण त्याचा सामना करू शकू.
ज्यांना या वयात गर्भधारणा करायची आहे त्यांनी यापेक्षा उशीर करू नका. त्याकरिता आधी योजना आखा. काही वेळेस आयव्हीएफसारख्या प्रक्रियेचादेखील आधार घ्यावा लागू शकतो.
आपल्या नियमित आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करू नका. आपण जरी संतुलित आहाराचे सेवन करत असाल आणि नियमित व्यायाम करत असाल तरीदेखील नियमित आरोग्य चाचणी करणे आवश्यक आहे. वेळोवेळी आपला रक्तदाब, थायरॉईड, रक्तातील ग्लुकोज आणि कोलेस्टेरॉलची पातळी तपासून पाहा. गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी आणि लवकर निदान करण्यासाठी तपासणी करणे आवश्यक असते. महिलांनी नेत्र तपासणी, त्वचेची तपासणी, दंत तपासणी, मॅमोग्राम आणि पॅप स्मीयर चाचणी करून घ्यावी.
आपली हाडे आणि स्नायू मजबूत ठेवा. ऑस्टियोपेनिया (हाडे कमकुवत होणे परंतु तरीही सामान्य मर्यादेच्या आत) आणि ऑस्टियोपोरोसिसने (पॅथॉलॉजिकल पातळीवरील हाडांची शक्ती कमी होणे) ग्रस्त असाल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. चाळीशीनंतर नियमितपणे कॅल्शियम घेणे आवश्यक आहे. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असलेल्या आहाराचे सेवन करावे. वजनावर नियंत्रण ठेवायला हवे.
Post a Comment