पारनेरच्या ‘फोडाफोडी’चे मुंबईत पडसादमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाविकास आघाडीतील धुसफूस दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. मुंबईतील दहा आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या आणि पारनेरचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीत यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील तणाव आणखी वाढल्याचं दिसतं. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे स्वत: ‘मातोश्री’वर जाऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर शरद पवार हे मातोश्रीवर जाण्याची ही केवळ दुसरीच वेळ होती.

पोलिसांच्या बदल्या आणि पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याचं एक कारण यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत. त्यामुळे शरद पवार यांना ‘मातोश्री’वर यावं लागल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पारनेर तालुक्यातील शिवसेनेतून निवडून आलेल्या पारनेर नगरपंचायतीच्या नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत 4 जुलै रोजी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये पाच नगरसेवक फोडून शिवसेनेला शह देणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेनं कल्याणमध्ये वचपा काढण्यात आला. कल्याण पंचायत समितीमध्ये शिवसेनेनं थेट भाजपशी हातमिळवणी करत राष्ट्रवादी काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला.

कल्याण पंचायत समिती सभापती व उपसभापतिसाठी नुकतीच निवडणूक झाली. याठिकाणी भाजपचे पाच आणि शिवसेनेचे चार तर राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी यांची राज्यात युती असून सत्तेत असल्याने कल्याण पंचायत समितीत याच दोन्ही पक्षांचे सभापती आणि उपसभापती निवडून येतील असा अंदाज होता. सभापती व उपसभापतिपद राष्ट्रवादीला देण्याचे आधीच निश्चित झाले होते, मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी रविवारी चक्रे फिरली आणि शिवसेनेने राष्ट्रवादीला दणका दिला.

पारनेरच्या कुरघोडीच्या राजकारणाची दखल शिवसेनेने घेतली. पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना दिला आहे. परंतु, हा निरोप शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत फोन करून अजित पवार यांच्यामार्फत पोहोचवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या नगरसेवकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख तसंच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे साधारण संध्याकाळी 6 च्या सुमारास ‘मातोश्री’वर दाखल झाले. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.शरद पवार ‘मातोश्री’मध्ये गेल्यानंतर काही वेळातच म्हणजे संध्याकाळी 6.30 च्या सुमारास मंत्री आदित्य ठाकरे बाहेर पडले. त्यांच्यापाठोपाठ जितेंद्र आव्हाडही बाहेर आले.

यानंतर मग 10 मिनिटांनी म्हणजे 6 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास गृहमंत्री अनिल देशमुख मातोश्रीवरून बाहेर पडले. अनिल देशमुख बाहेर पडल्यानंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्येच चर्चा झाली. एकीकडे अनिल देशमुख मातोश्रीवरून बाहेर पडत असताना, शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे 6 वाजून 48 मिनिटांनी मातोश्रीवर दाखल झाले. मात्र अवघ्या पाच सहा मिनिटांतच शरद पवारही 6 वाजून 54 मिनिटांनी मातोश्रीवरून निघाले.त्यामुळे अवघ्या अर्धा- पाऊण तासात दिग्गज नेत्यांनी नेमकी कोणात्या विषयावर चर्चा केली, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post