हुकूमशाह कोण हे भाजपच्या नेत्यांना खासगीत विचारा ; आ.रोहित पवार


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक निर्णय पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून घेतला जातो. मात्र, भाजप सरकारच्या काळात एका व्यक्तीची मक्तेदारी आणि हुकूमशाही होती. भाजपच्या नेत्यांना खासगीत विचारा ते तुम्हाला हेच सांगतील, असा टोला लगावत भाजप राजकीय पतंग उडवत जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी सोमवारी नगरमध्ये केला.

जिल्ह्यातील करोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आ. पवार सोमवारी नगरमध्ये आले होते. त्यावेळी माध्यमांनी आ. पवार यांचे महाविकास आघाडीवर भापकडून होणार्‍या आरोप आणि टिकेकडे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना आ. पवार म्हणाले, भाजपकडे सरकारवर टीका करण्यास मुद्दे नाहीत. त्यामुळे आघाडी सरकारमधील समन्वयाबद्दल ते सातत्याने बोलत आहेत. पण भाजपच्या बोलण्याला काही अर्थ नाही. भाजपचे राज्यातील नेते राजकीय पतंग उडवून जनतेची दिशाभूल करत आहेत. आघाडी सरकारमध्ये कुठलाही मतभेद नाही. वरिष्ठ पातळीवर चर्चा करून सर्व निर्णय घेतले जातात, असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

ऑक्टोबरपर्यंत राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी ‘सामना’तील लेखातून केला होता. त्यावरही आ. पवार यांनी भाष्य केले. भाजपचा एकूण अनुभव आणि विचारसरणी पाहता ते फार दिवस सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत. कर्नाटक, मध्यप्रदेशातही वेडेवाकडे करून भाजपने सत्तेत येण्याचा प्रयत्न केला. तसेच काही इथे होईल असे खा. राऊत यांना वाटत असावे.

भाजपबद्दलच्या त्यांच्या अनुभवावरून ते तसे बोलले असावेत, असा तर्क व्यक्त केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अनुभवी नेते असून जनतेचा या सरकारवर विश्वास आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला. करोनाच्या मुदद्यावर विरोधकांकडून होणारे आरोप बिनबुडाचे आहेत. देशात सर्वाधिक करोना टेस्ट महाराष्ट्रात होत आहेत. त्या प्रमाणात रुग्णही वाढत आहेत. राज्य सरकार करोना आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. राज्यातील सर्वसामान्यांची काळजी वाहणारे भाजपचे नेते पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांबद्दल का बोलत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

केंद्रातील भाजप सरकारने राज्याला मदत म्हणून दिलेले व्हेंटिलेटर हे फॉल्टी असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी यावेळी केला. करोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असल्याने कर्मचार्‍यांचे वेतन देण्यासाठी राज्य सरकारवर कर्ज घेण्याची वेळ आली असून सरकार अशा परिस्थितीत मंत्र्यांच्या गाड्यासाठी पैसे खर्च करत असल्याच्या आरोपावर आ. पवार म्हणाले, संपूर्ण गाड्यांचा खर्च हा 50 लाख ते 1 कोटी पर्यंत असेल, मात्र हा काही राज्याचा किंवा देशाचा मुद्दा नाही. मात्र अशा परिस्थितीत देखील भाजप राजकारण करत असेल तर मागच्या पाच वर्षांत त्यांनी काय-काय केले ते आम्ही देखील बाहेर काढू शकतो, असा सज्जड इशाराच त्यांनी दिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post