मोदींच्या लडाखभेटीनंतर शिखर धवनचे ट्विट व्हायरल


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - भारत- चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी अचानक लडाखला भेट दिली. त्यानंतर मोदींच्या लडाखभेटीची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. लोकांनी मोदींच्या या भेटीवर अनेक प्रतिक्रिया दिल्या. भारतीय क्रिकेटपटू शिखर धवननेही ट्विटरवर मोदींबद्दल भाष्य केले.

’’पंतप्रधान मोदींनी लेहमध्ये सैन्य दलाच्या जवानांना भेट देऊन नेतृत्व कौशल्य दाखवले आहे. मोदीजींचे हे पाऊल आपल्यासाठी आपले जीवन पणाला लावणार्‍या सैनिकांना प्रोत्साहन देईल’’, असे धवनने ट्विटरवर म्हटले.

पूर्व लडाखमधील गलवान खोर्‍यात भारत चीनमधील सैनिकांच्या धुमश्चक्रीत २० भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने सीमेवर ‘हायअलर्ट’ जारी केला असून अतिरिक्त सैनिक तैनात केले आहे. लडाख समुद्र सपाटीपासून उंचावर असल्याने अतिथंड प्रदेशात मोडते. तसेच डोंगर उताराचा आणि खडकाळ भाग असल्याने सैनिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सीमेवर तणावाची परिस्थिती असतानाच मोदींनी लडाखला भेट दिली.

पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी लडाखला अचानक भेट देऊन लष्कराच्या तयारीचा आढावा घेतला. वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी पंतप्रधानांना परिस्थितीची माहिती दिली. सीमेवरील निमू चौकीला मोदींनी भेट दिली. यावेळी मोदींबरोबर सरसेनाध्यक्ष बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post