इंदोरीकर महाराज हाजिर हाे !माय अहमदनगर वेब टीम
संगमनेर - प्रसिद्ध समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी कीर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याने त्यांच्या विरुद्ध संगमनेर न्यायालयात दाखल झालेल्या फिर्यादीवर आज सुनावणी झाली. न्यायालयाने दाखल झालेल्या फिर्यादीची दखल घेतली असून दि. ७ ऑगस्ट २०२० रोजी इंदोरीकर महाराज यांनी स्वतः न्यायालयासमोर हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहे.

इंदोरीकर महाराज यांनी गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केला आहे. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली होती. समितीने सर्व पुरावे पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडे सादर केले होते. जिल्हा शल्य चिकित्सकांना देखील पुरावे दिले होते. दरम्यान ही तक्रार राज्य आरोग्य विभागाकडे देखील करण्यात आली होती. पीसीपीएनडीटी समितीने इंदोरीकर महाराज यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करण्यास हिरवा कंदील दिल्यानंतर दि. १९ जून २०२० रोजी संगमनेर येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर भवर यांनी फिर्याद आणि पुराव्याचे कागदपत्रे संगमनेरच्या प्रथम वर्ग - १ न्यायालयात दाखल केले होते. त्यावर आज न्यायाधीश श्री. कोळेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. दरम्यान आज न्यायालयाचे न्यायाधीश श्री. कोळेकर यांनी सदर फिर्यादीची दखल घेत निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) महाराज यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः दि. ७ ऑगस्ट २०२० रोजी हजर राहावे, असे आदेश दिले आहे, अशी माहिती अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post